विद्यार्थी भारतीच्या दणक्याने मुंबई विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६४० रुपयात प्रवेश

विद्यार्थी भारतीच्या दणक्याने मुंबई विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६४० रुपयात प्रवेश

कल्याण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठातील एमएसडबल्यू विभागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून ४० हजार प्रवेश फी आकारण्यात येत होती. याबाबत विद्यार्थी भारती संघटनेने मुंबई विद्यापीठाकडे पत्रव्यवहार करत फी कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने मागासवर्गीय विद्यार्थांना ६४० रुपयांमध्ये प्रवेश दिले आहेत.

कोरोना काळात वाढत्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असताना कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत जनता त्रस्त झाली असून नवीन शैक्षणीक वर्ष सुरू झाली आहेत. अशातच पदवीत्तर विविध शाखांचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु प्रवेश शुल्कात मात्र बदल झाला नव्हता. कोरोना काळात ऑनलाईन वर्ग घेतले जात असून ही प्रवेश शुल्काच्या ड्राफ्ट मध्ये जिमखाना, कॉम्प्युटर, ओळखपत्र, फिल्ड वर्क, कॅम्प चार्ज, लायब्ररी असे अतिरिक्त शुल्क आकारले जात होते.

विद्यार्थी ऑनलाईन क्लास साठी लागणारा हायस्पीड डाटाचा खर्च स्वतः करीत असताना विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी आकारण्यात येत होती. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांची कठीण काळातही  लूटमार करीत  असताना विद्यार्थी भारती ने लढा दिला व अखेर आकारली जाणारी अतिरिक्त फी रद्द करण्यात आली. समाज कार्याचे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी ४० हजार वरून अवघे ६४० रुपये केली. विद्यापीठाच्या या निर्णयानंतर विदयार्थी भारतीच्या राष्ट्रिय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी आनंद व्यक्त केला असून ऑपन कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांची फी कमी व्हावी यासाठी लढा सुरू असून लवकरच त्यातही विजय मिळवू, असा आशेचा सुर असल्याचे त्यांनी सांगितले.