पोलीस कर्मचाऱ्याला गृहसंकुलात बंदी; पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल

पोलीस कर्मचाऱ्याला गृहसंकुलात बंदी; पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल

कल्याण (प्रतिनिधी) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला तो राहत असलेल्या कल्याणमधील गृहसंकुलात प्रवेशबंदी केल्याची घटना कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी सदरहू पोलिसाची तक्रार घेण्यास खडकपाडा पोलीस ठाण्यातच टाळाटाळ करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, याप्रकरणी ‘त्या’ पोलिसाची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ही घटना चर्चेचा विषय झाली.

मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणारे प्रवीण सूर्यवंशी कल्याणातील खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्री कॉम्प्लेक्स येथे आपल्या परिवारासह राहत आहेत. ते कर्तव्य बजावून परतल्यानंतर संकुलातील रहिवाशी असणारे इसम कोरोना आला असे सतत बोलून गेल्या काही दिवसांपासून त्यांचे खच्चीकरण करत होते. कोरोनाची पोलिसांना मोठ्या प्रमाणात बाधा होत असल्याने संकुलनामध्ये प्रवेश बंद केला होता. त्यांच्या दुचाकीची देखील दरम्यानच्या काळात तोडफोड करण्यात आल्याने पोलीस नाईक सूर्यवंशी यांनी तडक खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रकार कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे यांच्या कानावर घालूनही त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. दरम्यान, पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेतली नसल्याची सूर्यवंशी यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खडकपाडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यासंदर्भात धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक प्रवीण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मला गृहसंकुलामध्ये येण्यास मज्जाव करून कोरोना आला असे बोलून माझे खच्चीकरण केल्याचे सांगत आपल्या मोटरसायकलची तोडफोड करण्यात आल्याचे सांगितले. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता माझी तक्रार घेतली न गेल्याने रात्री उशिरा सोशल मीडियावर या अन्यायाची पोस्ट व्हायरल केल्याचे म्हणाले. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या गृहसंकुलामध्ये येऊन सबंधित इसमाची समजूत घातल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.