कल्याण-डोंबिवलीमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी...

कल्याण-डोंबिवलीमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी...

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली येथे अनधिकृत इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी तिघांविरोधात एमआरटीपी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या पार्घश्रवभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात घर खरेदी करण्यापूर्वी महापालिकेकडील टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून खातरजमा करूनच घर खरेदी करावे व नागरिकांनी आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील जन गण मन शाळेच्या शेजारी असलेल्या अनधिकृत इमारतीबाबत जमीन मालक पद्माकर बाळू ठाकूर, विराज पद्माकर ठाकूर व जितेंद्र शिवराम म्हात्रे यांच्याविरुद्ध एमआरटीपी ऍक्ट ३९७ अ प्रमाणे प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी विष्णुनगर पोलीस स्टेशन, डोंबिवली (प.) येथे गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यांना फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. संबंधित अनधिकृत बांधकामधारकांवर पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, महापालिका क्षेत्रात घर खरेदी करण्या पुर्वी सबंधित नागरिकांनी इमारतीच्या-जागेच्या अधिकृततेबाबत महापालिकेकडील टोल फ्री नंबर १८००-२३३-४३९२ व १८००-२३३-७२९५ या दूरध्वनीवर खातरजमा करूनच इमारतीत घर खरेदी करावे आणि आपले नुकसान टाळवे. अनधिकृत बांधकामात सदनिका-घरे खरेदी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.