स्वतंत्र कोकण विद्यापीठाची भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी 

स्वतंत्र कोकण विद्यापीठाची भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी 

मुंबई (प्रतिनिधी) : 
मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावप्रमाणे कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने लवकर पावले उचलावीत अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. भास्कर जाधव शुक्रवारी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली. शिक्षणप्रेमींचेही स्वतंत्र विद्यापीठाच्या या मागणीला समर्थन मिळत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

जाधव यावेळी पुढे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाकडे ७६४ महाविद्यालये सलग्न असून त्यांच्या कामकाजाचा प्रचंड भार मुंबई विद्यापीठावर पडत असून त्याचा ताण मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विद्यापीठाच्या परीक्षांच्या ऑनलाईन निकालांमध्ये झालेला प्रचंड गोंधळ, पेपरफुटीचे घडलेले प्रकार, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब अशा अनेक घटना घडल्या आहेत. याचा फटका कोकणातील विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कोकण विद्यापीठ निर्माण करण्याची आग्रही मागणी सर्व थरातून केली जात आहे.

स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिकांच्या गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील व कोकणचा विकासाला हातभार लावणारे अभ्यासक्रमांना चालना मिळेल. रत्नागिरी जिल्हयातील ४५, सिंधुदुर्ग जिल्हयातील ३८ आणि दक्षिण रायगडमधील २० अशा १०३ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करता येऊ शकते असेही भास्कर जाधव म्हणाले.