कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली स्मार्ट  सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प पायाभरणी समारंभ तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवली मुख्यालयातील स्मार्टसिटी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने सोमवारी झाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, राजू पाटील, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जेष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

निवडणुका येत असतात आणि जात असतात. मात्र राजकारण बाजूला ठेऊन काम करणे गरजेचे आहे. गाजर वाटप न करता चांगली कामे लोकांसमोर नेण्याचा नविन पायंडा पाडण्याची गरज पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. कल्याणच्या स्टेशन एरियातील सॅटीस प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भाजपचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी भाजप खासदारांच्या उपस्थितीत हा टोला लगावला. निवडणुकीनंतर कोणाची ना कोणाची तरी सत्ता येते,जाते. परंतु आपण दिलेली विकासकामांची वचने पूर्ण होणे गरजेचे असते. ५-६ वर्षांपूर्वी साडेसहा हजार कोटींचे वचन देण्यात आले होते. पण ठीक आहे ते निघून गेले असून आगामी निवडणुकीत गाजर वाटप न करता केवळ केलेली चांगली कामे लोकांसमोर नेण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. तर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनप्रमाणे को-गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन संकल्पना कल्याणात राबवण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

लोकहिताची कामे विहीत वेळेत व मुदतीत पुर्ण करणे आवश्यक आहे. प्रशासनाने नेहमीच जनतेला चांगली कामे दाखविणे आवश्यक आहे. शहराचा विकास करताना प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक संस्था  यांना एकत्रित करुन एक संघटन तयार करावे. त्यांच्याशी समन्वय साधून  शहर विकासाचा आराखडा तयार करावा अशीं सूचना त्यांनी केली. कल्याण डोंबिवली शहराचा विकास झपाट्याने होतो आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत  कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये कल्याण स्टेशन परिसर सुधारणा हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाहतुक मार्ग वेगळे करण्यासाठी बैलबाजार चौक ते सुभाष चौक उड्डाणपूल वाहनतळाच्या इमारजीची पुर्नबांधणी बस डेपो पुर्नविकास तसेच स्मार्ट रस्ते विकसित करुन सीसीटिव्ही यंत्रणा व सिग्नल व्यवस्था तसेच परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाकरीता ४९८ कोटी रु.खर्च अपेक्षित आहे. कामाचा कार्यारंभ आदेश दि.३१ जुलै रोजी देण्यात आला असून या कामाचा कालावधी ३ वर्षाचा  असल्याचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

सदर भूमीपुजन सोहळया नंतर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील स्मार्टसिटी ऑपरेशन सेंटरमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, कल्याण परिसरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बसविलेल्या ८ सिग्नल यंत्रणेचे उदघाटन करण्यात आले. हि सिग्नल यंत्रणा कार्यन्वित झाल्यानंतर एखादया वाहन चालकाने सिग्नल तोडल्यास सिग्नल यंत्रणेतील स्वयंचलित कॅमेराने त्याचा फोटो काढला जाऊन ज्याच्या नावावर वाहन रजिस्टर असेल त्याला इ-चलान म्हणजेच थेट दंडाचा संदेश प्राप्त होणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक‍ उपस्थित मान्यवरांना यावेळी दाखवण्यात आले.