कल्याण पूर्वेतील २० कोटींच्या विकास कामांचे खासदार-आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन

कल्याण पूर्वेतील २० कोटींच्या विकास कामांचे खासदार-आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या संयुक्त प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. मुंबई महानगर प्रादेशिक विकास महामंडळ (एमएमआरडीए) अंतर्गत, तसेच राज्य शासनाच्या विशेष विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २० कोटी रुपयांच्या कामांचा यात समावेश आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या व आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे खा. शिंदे आणि आ. गायकवाड यांनी एमएमआरडीएकडून मंजूर करून घेतली. या विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी पार पडले. या विकास कामांमध्ये आशेळे गाव गावदेवी प्रवेशद्वार ते भक्तीपीठपर्यंत रस्ता तयार करणे (५.६५ कोटी), नांदिवली कमान ते हनुमान मंदिरापर्यंत रस्ता तयार करणे (४.९९ कोटी), तिसगाव कमान ते नाल्यापर्यंत विकास आराखड्याप्रमाणे रस्ता तयार करणे (३.८० कोटी), एफ केबिन ब्रीज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वालधुनीपर्यंत रस्ता तयार करणे (४.३५ कोटी) या एमएमआरडीएअंतर्गत कामांचा, तर आमदार गायकवाड यांनी राज्य शासनाच्या विशेष विकास निधीतून मंजूर करून घेतलेल्या नांदिवली येथील तलावाचे शुशोभीकरण व जॉगिंग ट्रॅक (७५ लक्ष), १०० फुटी रस्त्या जवळील आरक्षण क्र. २९९ येथे सुसज्ज मनोरंजनाचे मैदान विकसित करणे (५० लक्ष) या कामांचा समावेश आहे.

याप्रसंगी खा. शिंदे आणि आ. गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, शिवसेनेचे उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, सदस्य संजय मोरे, नगरसेविका शीतल मंढारी आदींसह युतीचे असंख्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच स्थानिक नागरिकांनीही या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहत या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केले.