भारतासारखी आदर-गौरव करण्याचा संस्कार जगात कुठेही नाही- भूपेन्द्रभाई पंड्या

भारतासारखी आदर-गौरव करण्याचा संस्कार जगात कुठेही नाही- भूपेन्द्रभाई पंड्या

कल्याण (प्रतिनिधी) :
आपल्या देशात आदर-गौरव करण्याची प्रवृत्ती-संस्कार जसा आहे तसा जगभरात कुठेही नाही. आपण भारतीय ज्या प्रकारे व्यक्तीचा आदर-गौरव करतो तसा जगभरात कुठेही केला जात नाही, असे उद्गार भागवताचार्य भूपेन्द्रभाई पंड्या यांनी कल्याण येथे काढले. येथील चिकणघर येथील मंगेशी हॉलमध्ये आयोजित प्रजाराज फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या नवीन शैक्षणिक मदत योजनेचा शुभारंभ व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंचावर स्थानिक आमदार नरेंद्र पवार, प्रेमजी गाला, अतुल तन्ना, प्रजाराज फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आर. के पटेल, सचिव विष्णुकुमार चौधरी, अभेराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. पंड्या आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, जिचा आदर करायला नको अशा व्यक्तीचा आदर केला अथवा ज्या व्यक्तीचा आदर करायला हवा तिचा आदर केला नाही तर त्या देशात दुष्काळ पडतो, तेथे मरणप्राय यातना भोगाव्या लागतात व तेथील जनता भयग्रस्त होते. त्यामुळे ज्यांनी समाजासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी काही केले आहे अशा प्रेरणास्थानांचा गौरव केला पाहिजे. 

याप्रसंगी ट्रस्टचे सचिव तथा सा. प्रजाराजचे संपादक विष्णुकुमार चौधरी यांच्या एकाशष्टीनिमित्त तसेच प्रजाराजचे संस्थापक अभेराज चौधरी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करीत त्यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यात आला. ट्रस्टचे उपाध्यक्ष सुरेश संगोई यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेमार्फत दरवर्षी असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जात आहे. तरुणवर्गाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील प्रजाराज फौन्डेशन कार्य करीत असल्याचे सांगत यापुढेही अधिक गतीने संस्था समाजोपयोगी कार्य सुरु ठेवेल असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काही दानशूर व्यक्तींनी ट्रस्टला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत लिंबड यांनी आभार जयेश कारिया यांनी मानले.