बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप नेत्यांवर स्वपक्षियांचे ‘राजीनामास्त्र’

बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप नेत्यांवर स्वपक्षियांचे ‘राजीनामास्त्र’

कल्याण (प्रतिनिधी) :
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्यावरून ‘कल्याण कुणाचा बालेकिल्ला?’ यावरून शिवसेना-भाजपात युतीमध्ये आपसातच जोरदार घमासान सुरु झाले आहे. दोघेही मित्रपक्ष यावरून आक्रमक झाले आहेत. सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पश्चिम मतदारसंघावर जोरदार दावा करीत बंडाचा पवित्रा घेतल्याने पश्चिमेत विद्यमान आमदार भाजपचे असतानाही भाजपने ही जागा सेनेला सोडल्याने भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील आक्रमक होत पक्षश्रेष्ठींवर ‘राजीनामास्त्र’ उगारले आहे. हा मतदारसंघ पुन्हा भाजपला घेत विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनाच पुनश्च उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा अपक्ष निवडणुक लढण्याचा पवित्रा घेण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.

मागील विधानसभा निवडणूक युतीने स्वतंत्रपणे लढल्या असताना कल्याणमधील कल्याण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र पवार तर कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मात्र यावेळी शिवसेनेने कल्याण आपलाच बालेकिल्ला म्हणत पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघावर दावा केला. त्यातून कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेला देण्याचा निर्णय आला आणि कल्याण पश्चिम भाजपमध्ये संतापाचे वातावरण पसरले. पहिल्यांदा नरेंद्र पवार यांच्या ऐवजी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी भाजपमधील अनेक इच्छुकांनी दंड थोपटले असताना ही जागा सेनेला सोडल्याचे वृत्त येताच भाजपमधील आमदारकीच्या सर्व दावेदारांनी नरेंद्र पवार यांनाच उमेदवारीसाठी पाठींबा देत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला असल्याचा जोरदार दावा करीत मंगळवारी शक्तीप्रदर्शन केले.

मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पश्चिमेतील भाजपचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते आ. पवारांच्या कार्यालयाजवळ जमले. तेथे भाजपच्या सर्व नगरसेवक व बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले. त्यानंतर सायंकाळी महाजनवाडी हॉल येथे जनसंकल्प मेळावा घेत भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपलाच घ्यावा आणि येथून विद्यमान आमदार पवार यांनाच उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी केली. या मेळाव्याला आ. नरेंद्र पवार, मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे, ठाणे विभाग सरचिटणीस राजाभाऊ पातकर, दिनेश तावडे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, उपमहापौर उपेक्षा, महापालिकेतील गटनेते वरुण पाटील, दया गायकवाड, सचिन खेमा, अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, परिवहन सदस्य महेश जोशी, अनिल पंडित, जुगल किशोर जाखोटिया, प्रसाद पोतदार, रमेश कोनकर आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

सदर मेळाव्यात अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पश्चिमेतून नरेंद्र पवार यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी असा सूर व्यक्त केला. मनसेचे पदाधिकारी उदय समेळ यांनी नरेद्र पवार यांना मित्र म्हणून आमदारकीसाठी पाठींबा असल्याचे त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा शब्द दिला. यावेळी उपमहापौर उपेक्षा भोईर आपल्या भाषणात म्हणाल्या की, भाजपला काही वर्षांपूर्वी या भागात वॉर्ड अध्यक्ष नेमायला एक व्यक्ती मिळत नव्हता. आज कार्यकर्त्यांनी घराघरात भाजप पोहोचवली आहे. येथून आमदार म्हणून नरेंद्र पवारांना निवडणून आणले आहे. असे असताना आता हा मतदारसंघ सेनेला कसा काय सोडता येईल, असा सवाल उपस्थित केला.

यावेळी दिगंबर विशे, दिनेश तावडे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी आ. पवार यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीत आपण कपिल पाटील यांच्या प्रचाराचे काम केले नाही असा गैरसमज वरिष्ठ नेत्यांचा करून देण्यात आल्याने आपले तिकीट कापल्याचा खुलासा केला. त्यामुळेच ही जागा सोडली पक्षनेत्यांनी सेनेला सोडली. मात्र या निर्णयाने पदाधिकारी-कार्यकर्ते नाराज झाले आणि या सगळ्यांनी एकमताने मी अपक्ष निवडणूक लढवावी अशी गळ घातली आहे. प्रथम देश, नंतर पक्ष व त्यानंतर (आपण) स्वत: हे पक्षाचे सूत्र आहे, ते मी मोडू इच्छित नाही. प्रदेशाध्यक्षांना आपण निवेदन दिले असून ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील अशी मला अजून आशा आहे. आपण उद्या (बुधवार) दुपारी १२ पर्यंत वाट पाहू त्यांनतर सर्वानुमते पुढील निर्णय घेऊ असे पवार यांनी उपस्थितांच्या संमतीने जाहीर केले.