ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणुकांसाठी भाजप आमदाराची ‘खास’ घोषणा  

ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणुकांसाठी भाजप आमदाराची ‘खास’ घोषणा  

कल्याण (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावांतील सलोख्यास बाधा पोहोचत असल्याने गाव पातळीवरील या निवडणुका बिनविरोध पार पडाव्यात यासाठी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मतदारसंघातील बिनविरोध पार पाडणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. गायकवाड हे भारतीय जनता पक्षाचे आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर अधिक ताण येऊ नये, निवडणूक खर्चाची बचत व्हावी आणि विशेष म्हणजे गावातील सलोखा कायम राहून एकोपा राहावा, या हेतूने आमदार गायकवाड यांनी बिनविरोध निवडणुका पार पाडणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा केली आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघात श्रीमलंगवाडी, खरड, मांगरूळ, नेवाळी, पोसरी, नाऱ्हेन, उसाटणे, बुर्दुल व काकोळे या नऊ ग्रामपंचायती येत असून त्यामध्ये एकूण ३० गावे आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांनुसार त्या-त्या कामांवर खर्च करण्यात येईल. आमदार निधीसह इतर शासकीय योजनांमधून ग्रामपंचायतींना निधी देणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट करीत मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन आमदार गायकवाड यांनी गावांमधील ग्रामस्थांना केले आहे. मतदारसंघातील अधिकाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमदार म्हणून आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.