कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद हेच सर्वात मोठे अवॉर्ड आहे- डॉ. विजय सूर्यवंशी

कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद हेच सर्वात मोठे अवॉर्ड आहे- डॉ. विजय सूर्यवंशी

डोंबिवली (प्रतिनिधी) : कोविड साथीच्या बिकट परिस्थितीत महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन  बरे झालेल्या कोविड रुग्णांचे ब्लेसिंग हेच आपले सर्वांत   मोठे अवॉर्ड आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी काढले. डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटरच्या वर्षापूर्तीचे औचित्य साधून महापालिकेत आयोजिलेल्या हॉस्पिटल मॅनेजर्सच्या छोटेखानी सत्कार समारंभात बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. 

यावेळी आयुक्त पुढे म्हणाले की, महापालिकेतील इंजिनियर्स, डॉक्टर्स इतर अधिकारी-कर्मचारीवर्ग यांनी एकत्रितरीत्या टीम म्हणून केलेल्या कामामुळे महापालिकेस आज राष्ट्रीय पातळीवरील कोविड-१९ इनोव्हेशन अवॉर्ड  प्राप्त झाले, परंतु आपल्या रुग्णालयातुन बरे  झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद हेच खरे अवॉर्ड, त्यामुळे सर्वांचे काम हे कौतुकास पात्र आहे. सर्व अधिकारी-कर्मचारीवर्गाने अभिमान वाटावा असेच काम केले.

कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत इंजिनिअर टीम व इतर सर्वांनी उत्तमरित्या काम केल्यामुळे महापालिकेच्या जम्बो फॅसिलिटीचे सर्वत्र कौतुक झाले. त्यामुळे हॉस्पिटल मॅनेजर म्हणून काम केलेल्या अभियंतांचे मनोबल वाढवण्यासाठी या छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी दिली. अधिकारी/कर्मचारी कोविड पॉझिटिव झाल्यावर स्वतः लक्ष देऊन आयुक्तांनी काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा जीव वाचला हे आमच्यासाठी फार मोठं आणि महत्त्वाचं आहे, असे उद्गार कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी आपल्या भाषणात काढले.

आयुक्तांनी काम करण्यासाठी एनर्जी आमच्यात निर्माण केली, एकसंघ टीम बांधण्याचं सूक्ष्म नियोजन केल्यामुळे यशस्वीरित्या कोविडमध्ये काम करता आलं. कोविडमध्ये काम करण्यास अनेकांचा सुरुवातीस विरोध होता, परंतु आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आणि दाखवलेल्या विश्वासामुळे हे काम करता आले आणि आता अजूनही कोविडच्या लाटा आल्या तरी आम्ही सज्ज आहोत, असे उद्गार महापालिका सचिव संजय जाधव यांनी आपल्या भाषणात काढले. कोविडच्या पहिल्या लाटेत प्रारंभी अनंत अडचणी आल्या परंतु आयुक्त यांचा पाठिंबा असल्यामुळे सर्व सुरळीत झाले असे उद्गार उपअभियंता किरण वाघमारे यांनी आपल्या भाषणात काढले.

या छोटेखानी कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील, कोविड कालावधीत आर.आर. रुग्णालय, निऑन रुग्णालय, होली क्रॉस या रुग्णालयांचे नियोजन करणारे कार्यकारी अभियंता तरुण जूनेजा, कोविड रुग्णालयांच्या उभारणीसाठी काम करणारे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, साई निर्वाण कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके, टाटा आमंत्राचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, सावळाराम कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता किरण वाघमारे, पाटीदार कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता सुरेंद्र टेंगळे, वसंत व्हॅली, आर्ट गॅलरीचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता भालचंद्र नेमाडे, जिमखाना कोविड समर्पित रूग्णालयाच्या हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता रोहिणी लोकरे, रुक्मिणी प्लाझा रुग्णालयाचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता श्रीकांत मुंडे, सर्व कोविड सेंटरमध्ये विद्युत यंत्रणा उभारणारे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सर्व कोविड रुग्णालयातील खानपान व्यवस्था सांभाळणारे महापालिका सचिव संजय जाधव, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, शहर अभियंता यांचे स्वीय सहाय्यक भागवत यांचा भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.