अतिवृष्टीने कोकण रेल्वेला ‘ब्रेक’; जनजीवन विस्कळीत

अतिवृष्टीने कोकण रेल्वेला ‘ब्रेक’; जनजीवन विस्कळीत

मुंबई (प्रतिनिधी) :
सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे कोकणातील प्रमुख नद्यांना पूर आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोहा-आपटे स्थानकादरम्यान रेल्वे गेट जवळ भूस्खलन झाल्याने रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा पडला. परिणामी कोकण रेल्वे बंद झाली. त्यातच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर पुढील २४ तास रेल्वे गाड्या सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांच्या हालास पारावार उरला नाही.  

कोकणातील कुंडलिका, सावित्री, जगबुडी, वशिष्ठीसह कोकणातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी आसपासच्या शहरात-परिसरात जागोजागी पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. रोहा-आपटे रेल्वे मार्गालगत भूस्खलन होऊन रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा पडला. त्यामुळे सकाळी ६ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद झाली. कोकणातून मुंबईकडे व मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे पर्यायी प्रवास शोधण्यात प्रचंड हाल झाले. दरम्यान, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने मध्य रेल्वेने पुढील २४ तास कोकण रेल्वे मार्गावर गाड्या सोडण्यास नकार दिला आहे. 

चिपळूण शहरातील बाजारपेठेत कंबरेपर्यंत पुराचे पाणी भरल्याने दुकानातील मालाचे प्रचंड नुकसान झाले. खेडच्या जगबुडी नदीचे पाणी सतत धोक्याची पातळी ओलांडत होते. संगमेश्वर-माखजन भागात पूरस्थिती ओढवली असून तेथील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. राजापूर येथील जवाहर चौकात बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने तेथील दुकानदारांचे नुकसान झाले आहे. रायगडमध्ये देखील सलग पडलेल्या पावसाने नद्यांना पुर आल्याने जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला.

कोकण रेल्वेने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे!

रविवारी कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाल्याने वेगवेगळ्या स्थानकात अडकून पडण्याची वेळ प्रवाशांवर आली. इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुळात हवामान खात्याने आधीच अतिवृष्टीचा  इशारा दिल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने पूर्वतयारीत राहणे आवश्यक होते, पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. ही व्यवस्था केली गेली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते. यापूर्वी २००५ मध्ये अतिवृष्टीचा फटका सर्वच यंत्रणांना बसला होता. त्यापासून धडा घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयारीत ठेवणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे राजू कांबळे यांनी व्यक्त केली आहे.