३०० वर्षे जुन्या वडाची पूजा करण्यापासून बिल्डर्सच्या बाउन्सर्सनी रोखले

३०० वर्षे जुन्या वडाची पूजा करण्यापासून बिल्डर्सच्या बाउन्सर्सनी रोखले

ठाणे (प्रतिनिधी) :
वट पौर्णिमेच्या निमित्ताने ३०० वर्ष जुन्या असलेल्या खाजगी जागेतील महाकाय वडाच्या झाडाची पूजा करण्यास गेलेल्या सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी विकासकाच्या स्त्री-पुरुष बाउन्सर्सनी रोखल्याची घटना ठाणे येथे रविवारी घडली. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच वडाच्या रोपट्यांची प्रतिकात्मक पूजा करीत वृक्ष संवर्धनाबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचा संदेश दिला.

ठाणे येथील कोलशेत परिसरात एअर फोर्स स्टेशन असून त्या जवळील एका खाजगी बिल्डर्सच्या जागेत ३०० वर्ष जुने असलेला महाकाय वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचे जतन व्हावे, तसेच ठाण्यातील सर्व पुरातन आणि दुर्मिळ वृक्ष संरक्षित व्हावेत व कोणत्याही विकासकामांमध्ये या वृक्षांना हानी पोहोचू नये यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियान व म्युजतर्फे सदरच्या हेरिटेज वडाची पूजा करण्याचा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खाजगी विकासकाने वृक्षप्रेमी नागरिक व पर्यावरणवादी कार्यकर्ते यांना रोखण्यासाठी स्त्री-पुरुष बाऊन्सर्स नियुक्त केले होते. त्यांनी सदर वटवृक्षाची पूजा करण्यास विरोध केला. त्यामुळे वृक्षाजवळ असलेल्या रस्त्यावर या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पूजा केली. यावेळी अंजली भालेराव, मातृसेवा फाउंडेशन, नितीन देशपांडे धर्मराज्य पक्ष, ठाणे नागरिक प्रतिष्ठानचे अनिल शाळीग्राम, पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावलकर, आदींनी आपले विचार व्यक्त केले. 

३०० वर्ष जुन्या या वृक्षाच्या हानी पोहोचविण्यात येत असल्याचा जागरूक नागरिकांना संशय आहे. मात्र सबंधित विकासकाकडून सदर झाडास कोणतीही क्षती झाली नसल्याचे सांगितले जात आहे. इतर नैसर्गिक संसाधनाप्रमाणेच वृक्ष खाजगी मालमत्ता नसुन सार्वजनिक मालमत्ता असल्याने त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असल्याची भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांकडून आज मांडण्यात आली. ग्लोबल वार्मिंगचे संकट, भीषण पाणी टंचाई, पर्यावरणाची हानी या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाद्वारे वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न होता, असे रोहित जोशी यांनी सांगितले.