पथदिव्यांवरील केबल वायर्समुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका!

पथदिव्यांवरील केबल वायर्समुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका!

कल्याण (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांमधील पथदिव्यांवरून केबलच्या वायर्स टाकण्यात आल्या आहेत. या वायर रस्त्यावर पडून खालून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराकडे महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी, तसेच कडेला असलेल्या पथदिव्यांवरून केबलच्या वायर्स टाकण्यात आल्या आहेत. या केबल वायर्स तुटून खाली पडल्यास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकिंमध्ये त्या अडकून त्यांना गंभीर अपघात होऊ शकतो. काही ठिकाणी पथदिव्यांवरून टाकलेल्या या वायर तुटून खाली पडलेल्या अथवा लोंबकळताना दिसून येत आहे.

पथदिव्यांवरून केबल वायर्स टाकण्याची परवानगी महापालिकेने कशी दिली, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे. वाहतूक पोलिसांनी त्यासाठी एनओसी दिली आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उत्पन्न होत आहे.