ग्राहकांकडील २०४ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वीज खंडित करण्याची मोहीम

ग्राहकांकडील २०४ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वीज खंडित करण्याची मोहीम

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ४ लाख ६ हजार वीज ग्राहकांकडे महावितरणचे २०३ कोटी ७६ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत असून यात १ डिसेंबरपासून आतापर्यंत २५ हजार ५८८ थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडण्यात आली. परिमंडलातील वीज ग्राहकांनी विहित मुदतीत वीजबिल व थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

कल्याण परिमंडलात कल्याण-एक (डोंबिवली, कल्याण), कल्याण-दोन (बदलापूर,मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ), पालघर (बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा, पालघर, सफाळा, तलासरी, विक्रमगड) व वसई (वसई, वाडा, विरार, आचोळे, नालासोपारा) या चार मंडल कार्यालयांचा समावेश होतो. परिमंडलात महावितरणचे एकूण २४ लाख ९६ हजार वीज ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास १६ टक्क्यांहून अधिक ग्राहकांकडे २०३ कोटी ७६ लाखांची थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे १०१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा, पथदिवे, कृषिपंप आदी वर्गवारीतील ग्राहकांकडे १०३ कोटींची थकबाकी आहे.

सदर थकबाकीच्या वसुलीसाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे मार्गदर्शन आणि मुख्य अभियंता अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. १ डिसेंबरपासून आतापर्यंत २४ हजार ९३१ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात तर ६५७ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून चोरट्या मार्गाने विजेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वसुली व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेत अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, सुनील काकडे, अशोक होलमुखे, किरण नगावकर यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत.  महावितरणने ग्राहकांसाठी वीजबिलांचा भरणा अधिक सुलभ केला असून त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पारंपरिक वीजबिल भरणा केंद्राशिवाय २४ तास कधीही भरणा करता येऊ शकणारे मोबाईल अँप (mobile app) तसेच केवळ ग्राहक क्रमांक टाकून ऑनलाइन भरणा करता येऊ शकणारे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ उपलध करून दिले आहे. याशिवाय सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येत आहेत. या उपलब्ध पर्यायांचा वापर करून वीजबिल वेळेत भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

पुनर्रजोडणी शुल्क भरल्याशिवाय पुन्हा जोडणी नाही

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर विशिष्ट प्रणालीमार्फत त्याची नोंद करण्यात येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशा ग्राहकांची फेरपडताळणीही केली जाते. पुनर्रजोडणीचे शुल्क भरून प्रतीक्षा केल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. डिसेंबर महिन्यात कल्याण परिमंडलात सुमारे २७ लाख रुपयांचे पुनर्रजोडणी शुल्क भरून प्रतीक्षा केल्यानंतरच १६ हजार ६३३ ग्राहकांची जोडणी पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी चालू बिलाचा मुदतीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.