केडीएमसीच्या आवारात ‘पत्त्यांचा खेळ’ आणि ‘दारूच्या बैठका’

केडीएमसीच्या आवारात ‘पत्त्यांचा खेळ’ आणि ‘दारूच्या बैठका’

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात खेळण्याचे पत्ते आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या प्रकारामुळे महापालिकेच्या आवारात चालते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला असून महापालिका सुरक्षारक्षकांच्या कर्तव्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येथे पत्त्यांचा खेळ चालतो की, जुगार की, दारूच्या बैठका, याबाबत पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महापालिका प्रशासनाचे मुख्यालयाच्या आवारातच कोणतेही नियंत्रण नसल्याचे यामुळे समोर आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात आली असून सर्व कारभार प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर शासनाने सोपविला आहे. महापालिकेच्या शंकरराव चौकातील मुख्यालयाच्या आवारात अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची वाहने पार्क केली जातात. तसेच बाहेरील अभ्यागत, लोकप्रतिनिधींची वाहने देखील येथे पार्क होतात. महापालिकेच्या वाहनांवर असलेल्या चालकांना

विश्रांतीसाठी विश्रामगृहवजा खोली आहे. काही वाहनचालक मुख्यालयाच्या आवारात टाईमपास करीत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या आवारात असलेल्या वर्षोनुवर्ष बंद अवस्थेतील कारंज्या लगतच्या मोकळ्या जागेत लाकडी जाहिरात बोर्डाचा आडोसा करून त्यामागे ‘काहींनी’ ‘बैठकीची व्यवस्था केल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी पत्त्यांचा खेळ खेळला जातो की, जुगाराची बैठक रंगते याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. येथे पालिका कर्मचाऱ्यांच्या ‘बैठका’ रंगतात की, बाहेरील जुगाऱ्यांनी तेथे आपला

अड्डा जमावला आहे ते स्पष्ट होत नाही. आजूबाजूला दारूच्या बाटल्या मोठ्या संख्येने पडलेल्या आढळून येत असल्याने तेथे दारू पिणाऱ्या मद्यपींचा राबता असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा असताना तिचे महापालिका मुख्यालयाच्या आवारात चालणाऱ्या या गैरप्रकारांकडे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या आवारात एक संशयास्पद दुचाकी आढळून आल्याने त्यावेळी तो मोठा चर्चेचा विषय ठरला होता. महापालिकेत

येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या वाहनात लाठ्याकाठ्या वा तत्सम वस्तू सापडण्याचे प्रकारही घडले आहेत. असे असताना महापालिकेचे सुरक्षारक्षक नेमके कोणत्या कामात व्यस्त असतात. डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासारखे कठोर प्रशासक असतानाही महापालिका मुख्यालयात असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.