अंध-गतिमंद कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठाणे येथे साजरा

अंध-गतिमंद कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठाणे येथे साजरा

ठाणे (प्रतिनिधी) : 
'भेटला ना कुणी सोबती, ना सखा, आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा, डोळ्यांचा प्रवास आजन्म तमाचा, तरी रोज दिसे कवडसा तेजाचा, येथे वेळ कुणा कवटाळण्या दु:खा'.. या कवितेच्या ओळीप्रमाणे आपल्या अंधत्वावर मात करत आपल्या सुमधुर आवाजाने व जादुई बोटांच्या वाद्य वादनाने सादर झालेल्या सांगीतिक मैफिलीने ठाणे महानगरपालिका व धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेचा यंदाचा 'जागतिक दिव्यांग दिन' मोठ्या उत्साहात साजरा झाला.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नुकताच डॉ. काशिनाथ घाणेकर येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उप महापौर पल्लवी कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती जयश्री डेव्हिड, नगरसेविका परिषा सरनाईक, स्नेहा आंब्रे, जिद्द शाळेच्या मुख्याध्यपिका अर्चना शेट्टे आदी उपस्थित होते. दरवर्षी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका दिव्यांग बांधवांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतो.

धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष शाळेतील आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध विशेष शाळांमधील दिव्यांग मुलांच्या मनोरंजनासाठी आदित्य प्रतिष्ठान ठाणे, दिव्यांग कला केंद्र प्रस्तुत 'अरेरे ते अरेव्वा' हा किरण नाक्ती यांनी दिग्दर्शित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे जन्मताच अंधत्व असणाऱ्या गायक, वादक कलाकारांनी सादर केलेल्या कलेने उपस्थितांची मने जिंकली.