कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी-रंगपंचमी साध्या पद्धतीने साजरी करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी-रंगपंचमी साध्या पद्धतीने साजरी करा

ठाणे (प्रतिनिधी) : मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा होळीचा उत्सव व रंगपंचमी यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी दिनांक २८ व २९ मार्च २०२१ रोजी चा होळी उत्सव व रंगपंचमी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीकरांना दोन्ही महापालिकांच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी शासनाच्या वतीने मार्गदर्शन सुचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. 

शासनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, होळीचा सण साजरा करताना मोठया प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणे तसेच यामुळे होणारे वायु प्रदुषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये. रंगपंचमी अर्थात धुलीवंदनाच्या दिवशी मोठया प्रमाणावर रंगाचा वापर करण्यात येतो, त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये तसेच ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत वैयक्तिकरित्या सुद्धा हे उत्सव करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंड संहिता १८६० नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.