हरहुन्नरी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भाजप नेत्याचा वाढदिवस साजरा

हरहुन्नरी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भाजप नेत्याचा वाढदिवस साजरा

टिटवाळा (प्रतिनिधी) :
आजकाल वाढदिवसाला अवाढव्य खर्च करीत साजरा करण्याच्या सोहोळ्याचे स्वरूप आले आहे. मात्र आपला वाढदिवस हा भावी पिढीला घडवणारा, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणारा व समाजात एक सकारात्मक संदेश देणारा ठरावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव परेश गुजरे यांनी सर्वंम प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिटवाळा शहरातील गुणवंत, हरहुन्नरी व कर्तुत्ववान शालेय विद्यार्थ्यांना ‘बालरत्न पुरस्कार’ देत त्यांचे कौतुक करीत आपला वाढदिवस साजरा केला. रिजेन्सी सर्वम गृहसंकुलातील क्लब हाउसच्या सभागृहात ‘बालरत्न पुरस्कार’ वितरण सोहोळ्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना परेश गुजरे यांनी, मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा प्रदेश सचिव म्हणून कार्यरत असलो तरी आपल्या शहरासाठीही वेळ देऊन सर्वांना योग्य ती मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन असा शब्द उपस्थितांना दिला. यापुढेही व्यवसाय मार्गदर्शन शिबिरासह, नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर तसेच नवीन पिढीसाठी नाविन्यपूर्ण मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी अण्णा वाणी, सुभाष जोशी आदी मान्यवरांनी उपस्थितांना उद्बोधक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी मांडा टिटवाळा विभागातून श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त सुभाष जोशी, महागणपती हॉस्पिटलचे विक्रांत बापट,  गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, हिंदुमहासभेचे अण्णा वाणी, शिवसेना उपविभागप्रमुख रेवनाथ पाटील, भाजपा मोहने टिटवाळा मंडळ सरचिटणीस शक्तिवान भोईर, भाजपा कल्याण तालुका सरचिटणीस प्रदीप भोईर, मनसेचे प्रभाग अध्यक्ष भूषण जाधव, मिलिंद सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य भूषण जाधव, काँग्रेस पार्टीचे टिटवाळा विभाग अध्यक्ष राजेश दीक्षित यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला आलेल्या विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सोहोळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे  सर्वम प्रतिष्ठानच्या वतीने पवित्र अशी तुळशीचे रोप  देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वंम प्रतिष्ठान माध्यमातून किरण गुजरे, देवा पाटील, हेमंत जोग, राजेश वारणकर, महेश पतंगे, दिलीप राठोड, अक्षय कळसकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.