डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची खा. श्रीकांत शिंदेंची लोकसभा अधिवेशनात मागणी

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची खा. श्रीकांत शिंदेंची लोकसभा अधिवेशनात मागणी

कल्याण (प्रतिनिधी) :
देशभरात डॉक्टरांवर होत असलेले वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून हे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या मागणीचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुनरुच्चार करीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे यासाठी केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली.

शुक्रवारी संसदेमध्ये पहिल्याच दिवशी शून्य प्रहर काळात देशभरात डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आणत खा. शिंदे या हल्ल्यांचा निषेध करत सरकारचे या गंभीर घटनेकडे लक्ष वेधले. नुकत्याच डॉक्टरांवरील झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे पूर्ण एक दिवस देशात वैद्यकिय सेवा संपूर्णपणे बंद राहिली. देशभरात आतापर्यंत एक हजारहून अधिक अशा घटना झाल्या असून ७५% घटनांमध्ये डॉक्टर बळी पडले आहेत. महाराष्ट्रातही आतापर्यंत डॉक्टरांवरील हल्ल्याच्या ५० घटना घडल्या आहेत. यासारख्या अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नयेत, यासाठी सरकारने वैद्यकिय क्षेत्रामधील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी होणारी गुंतवणूक ही १.४ टक्के इतकीच आहे. अमेरिका, कॅनडा, फ्रांस, बेल्जियम, जपान, नेदरलँड, स्विडन या राष्टांमध्ये हेच प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे आणि नेपाळ, भूतान, बांगलादेश आदी देशांपेक्षाही आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी होणारी गुंतवणूक कमी आहे. देशभरात डॉक्टर आणि रुग्ण यांचे प्रमाण खूपच कमी असून विश्व स्वास्थ्य संस्थेने हे प्रमाण वाढविण्याबाबत सुचित केले असल्याकडे सभागृहात त्यांनी स्पष्ट केले. तसेच देशातील डॉक्टरांची संख्या वाढावी तसेच नागरिकांना मुलभूत वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूकीत वाढ करुन पायाभूत सुविधां वाढविणे  गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मांडले.