कल्याणमध्ये चव्हाण आणि गायकवाड यांची हॅट्रीक

कल्याणमध्ये चव्हाण आणि गायकवाड यांची हॅट्रीक

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याणमधील चार पैकी तीन मतदारसंघात मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या पारड्यात तीन जागांचे दान टाकले तर एका मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खाते उघडत संपूर्ण राज्यातून एकमेव आमदार निवडून आले आहेत. यामध्ये कल्याण पश्चिममधून महायुतीमधील शिवसेनेचे विश्वनाथ भोईर निवडून आले. कल्याण पूर्वमधून भाजपचे गणपत गायकवाड यांनी शिवसेना बंडखोराचा निर्णायक पराभव करीत, तर डोंबिवलीमधून भाजपचे रविंद्र चव्हाण या दोघांनी आपल्या विजयाची हॅट्रीक साधली. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांनी निर्णायक मते घेत आपला विजय साकारला.

कल्याण पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना ६४३७३ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे बंडखोर नरेंद्र पवार यांना ४३०७० मते मिळाली तर मनसेचे प्रकाश भोईर यांना तिसऱ्या क्रमांकाची ३७४२४ मते मिळाली. विश्वनाथ भोईर यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी पवार यांच्यापेक्षा २१६६८ चे मताधिक्य घेत कल्याण पश्चिमचा मतदारसंघ शिवसेनेला मिळवून दिला.

कल्याण पूर्वेत देखील अपक्ष आमदार गणपत गायकवाड, जे भाजपकडून यावेळी निवडणूक लढवताना शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांचा निर्णायक मताधिक्य मिळवीत विजय मिळवला. गायकवाड यांना ६०३३२ तर बोडारे यांना ४८०७५ मते मिळाली. राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार प्रकाश तरे यांना १६७५७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अश्विनी धुमाळ यांना चौथ्या क्रमांकाची १२८९९ मते मिळाली.

कल्याण ग्रामीणमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद (राजू) पाटील आणि महायुतीकडील शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांच्यात प्रारंभापासून चुरस निर्माण झाली होती ती शेवटपर्यंत कायम राहिली. पाटील यांना ९०८१६, म्हात्रे यांन ८४५५५ मते मिळाली. पाटील यांनी अखेरीस ६२६१ निर्णायक मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

डोंबिवली मतदारसंघातून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मनसेचे मंदार हळबे यांचा ४१३११ मताधिक्याने पराभव करीत आपल्या विजयाची हॅट्रीक केली. चव्हाण यांना ८६२२७ तर हळबे यांना ४४९१६ मते मिळाली. 

विश्वनाथ भोईर यांची विजयी प्रतिक्रिया

विश्वनाथ भोईर यांनी आपल्या विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनी आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आभार मानले. कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या सर्वांगीण उन्नतीकरिता आणि मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले. दरम्यान, भोईर यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह मिरवणुकीने जाऊन शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.