महावितरणच्या कल्याण परिमंडळातील कर्मचाऱ्यांचे मुख्य अभियंत्यांनी केले कौतुक 

महावितरणच्या कल्याण परिमंडळातील कर्मचाऱ्यांचे मुख्य अभियंत्यांनी केले कौतुक 

कल्याण (प्रतिनिधी) : 
महावितरणच्या कल्याण परिमंडळात नुकताच  जनमित्र दिन साजरा करण्यात आला. भर पावसात तसेच पुराच्या पाण्यात कल्याण परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या वसई, विरार, वाडा, पालघर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आदी भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या सर्व जनमित्रांच्या कामाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी कौतुक केले. यावेळी १०४२ सेफ्टी हेल्मेटसह टॉर्चचे (विजेरी) वितरण करण्यात आले. महावितरणच्या सर्व शाखा कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

महावितरणची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने महावितरणचा कर्मचारी हा नेहमी कामात व्यस्त असतो. महावितरणच्या कल्याण परिमंडळात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात ही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कर्त्यव्यदक्ष राहून ग्राहक सेवा बाजवली. जिथे वीज यंत्रणा पुराच्या पाण्यात गेली होती तेथील वीज पुरवठा बंद करून महावितरणचे जनमित्र सतत लक्ष ठेऊन होते. यामुळे या परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. तसेच पूर ओसरल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेऊन खंडित वीज पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यात आला. यावेळी बऱ्याच जनमित्रांनी सलग २४ तासापेक्षा अधिक काळ आपली सेवा बजावली तर अनेक जनमित्र दोन-तीन दिवस आपल्या घरी गेले नाहीत. सार्वजनिक व साप्ताहिक सुटीही या कर्मचाऱ्यांनी घेतली नव्हती.

फिल्डवर कार्यरत या कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेत कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी सर्व शाखा कार्यालयात जनमित्र दिवस साजरा करण्याचे आदेश दिले होते. यावेळी प्रत्येक शाखा कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार आवश्यक १०४२ सेफ्टी हेल्मेटसह टॉर्चचे वितरण करण्यात आले आहे. या सेफ्टी हेल्मेटसह टॉर्चमुळे जनमित्रांना रात्री काम करने अधिक सोयीचे होणार आहे. यामुळे ग्राहकांच्या सेवेत गुणात्मक फरक पडेल, असे मत मुख्य अभियंता शेख यांनी व्यक्त केले.