माळशेज घाट रस्ता दुरुस्तीच्या मागणीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल

माळशेज घाट रस्ता दुरुस्तीच्या मागणीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण-मुरबाड-माळशेज-अहमदनगर-निर्मल या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील माळशेज घाटातील रस्ता सुरक्षिततेच्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्याची मागणी ‘कोंकण वृत्तांत’ने केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह सबंधित खासदारांकडे इमेलद्वारे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरेने दखल घेत सदरचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह खात्याचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना पाठविले आहे.

सध्या देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. असे असले तरी महत्वाची व तातडीची कामे करण्याची असलेली आवश्यकता, व लवकरच येऊ घातलेला पावसाळा पाहता माळशेज घाटातील अपघातांची संभाव्यता व धोका कमी होऊन जीवितहानी व एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीची हानी टाळण्यासाठी याबाबत तातडीने संबंधितांना निर्देश देण्याची मागणी ‘कोंकण वृत्तांत’ने केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘कोंकण वृत्तांत’च्या या मागणीची त्वरेने दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह खात्याचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना पाठविले. वस्तुतः कल्याण-मुरबाड-माळशेज-अहमदनगर-निर्मल या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ हा केंद्र शासनाच्या रस्ते आणि भूपृष्ठवहन मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असून नितीन गडकरी या खात्याचे मंत्री आहेत. त्यांच्याकडून याप्रकरणी काय कार्यवाही करण्यात येईल याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

माळशेज घाट रस्ता (राष्ट्रीय महामार्ग) अवघड, धोकादायक व अपघाती वळणमार्ग असल्याने यापूर्वी या घाटात अनेक मोठे अपघात घडलेले आहेत. ३-४ वर्षापूर्वी राज्य परिवहन महामंडळाची बस खोल दरीत कोसळून घडलेल्या मोठ्या अपघातात मोठी जीवितहानी झाली होती. त्याचप्रमाणे पावसाळ्यात येथील अपघातांची शक्यता अधिकच वाढते. येथे पावसाळा-हिवाळ्यात दिवसा आणि रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात धुकेही पसरलेले असते. या बाबी लक्षात घेता या राष्ट्रीय महामार्गावरील, विशेषत: माळशेज घाटातील सुरक्षित प्रवासासाठी या घाटातील - रस्त्याची दुरुस्ती, दिशादर्शक फलक-वाहतूक चिन्हे इ., डोंगरावरून कोसळणारे दरड-दगडी यांच्या संरक्षक जाळ्या इत्यादी विविध प्रकारची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने-त्वरेने करून घेण्याकडे सदरच्या निवेदनात लक्ष वेधण्यात आले होते.