चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेले

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेले

चिपळूण (प्रतिनिधी) : 
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण मंगळवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २३ ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. यात काठावरील ५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मध्यरात्री २ वाजता घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे, तर परिसरातील अन्य गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी गावावर संकट कोसळले आहे. गावातील २३ ते २५ जण बेपत्ता आहेत. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात हे गाव वसले आहे. एनडीआरएफच्या पथकाला मदतीसाठी बोलवण्यात आले आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले तिवरे धरण रात्री ९ च्या सुमारास भरले होते. आधी धरण भरले होते त्यात मुसळधार पावसामुळे रात्री फुटले. यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेली एक वाडीच वाहून गेली. धरण फुटल्यानंतर वशिष्टी नदीला पुर आला असून अनेक गावांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. 

तिवरे धरण हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे सदर धरणाची साठवणूक क्षमता २.४५२ दशलक्ष घनमीटर / ०.०८ टीएमसी येवढी आहे. सदर धरणाचे बांधकाम २०१२ साली पूर्ण झाले आहे. सदर धरण फुटल्यामुळे तिवरे व धणेगाव यांना धोका आहे. पुढे जाऊन हे पाणी वशिष्टी नदीला जाऊन मिळते. धरण फुटणार याची आधीच कल्पना होती. धरण फुटणार असल्याची शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेत २१ जण बेपत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : अनंत हरिभाऊ चव्हाण (६३), अनिता अनंत चव्हाण (५८), रणजित अनंत चव्हाण (१५), ऋतुजा अनंत चव्हाण (२५), दुर्वा रणजित चव्हाण (१५), आत्माराम धोंडू चव्हाण (७५), लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२), नंदाराम महादेव चव्हाण (४५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५०), रवींद्र तुकाराम चव्हाण (५०), रेश्मा रविंद्र चव्हाण (४५), दशरथ रविंद्र चव्हाण (२०), वैष्णवी रविंद्र चव्हाण (१८), अनुसिया सीताराम चव्हाण (७०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), बळीराम कृष्णा चव्हाण (५५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धाडवे (१८), सुशील विश्वास धाडवे (४८), रणजित काजवे (३०), राकेश घाणेकर (३०). आतापर्यंत ११ मृतदेह सापडले आहेत. बळीराम कृष्णा चव्हाण या व्यक्तीला वाचविण्यात यश आले आहे.