तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार - ना. दीपक केसरकर

तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार - ना. दीपक केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) :
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. तुळजाभवनी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या दरोडाप्रकरणी सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी केसरकर पुढे म्हणाले, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या-चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळा बाजार  व गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली असून समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआडी) मार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी २००१ ते २००५ या कालावधीमधील संबंधित व्यक्ती, अधिकारी यांना आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दरोडा प्रकरणी अटक आरोपींकडून तीन लाख ७८ हजार आठशे सहा रुपये रोख रक्कम, दोन मोटार सायकली, हत्यारे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. राज्यातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळावरील चोऱ्या तसेच मौल्यवान मूर्ती व दागिने यांच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत परिपत्रकाद्वारे सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. देवस्थान ट्रस्टनी सुरक्षा रक्षकांची मागणी केल्यास त्यांना महाराष्ट्र सुरक्षा दलामार्फत ती पुरवली जाईल. यावेळी रवींद्र फाटक, प्रा. जोगेंद्र कवाडे, गिरीष व्यास, डॉ. मनिषा कायंदे आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.