कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी चतुःसूत्रीचा वापर करावा – एकनाथ शिंदे

कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी चतुःसूत्रीचा वापर करावा – एकनाथ शिंदे

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत.पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला तर आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वास ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

सदर समारंभास  खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे  आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी  राजेश  नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हावासियांना संबोधित करतांना पालकमंत्री शिंदे म्हणाले आपण  कोरोनशी सगळं बळ, आपली सर्व साधनसामग्री एकवटून लढतोय आणि मुख्य म्हणजे त्यात यशस्वी देखील होतोय. मुंबई, ठाणे, तसेच एमएमआर शहरांमधील गेल्या काही दिवसांमधली आकडेवारी दिलासादायक आहे. नव्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने खाली येतोय. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर, म्हणजे रिकव्हरी रेट वाढतोय, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी सातत्याने वाढतोय, मृत्यूदर कमी करण्यात आपण यश मिळवतोय. 

जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महापालिका प्रशासन यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. ठाणे, नवी मुंबईत, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, मीरा रोड, भाइंदर, भिवंडी अशा सर्वच शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात कमी अधिक क्षमतेची रुग्णालये उभारण्यात आली. करोनाची तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी लॅब्जना परवानगी देण्यात आली. सर्व महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी सुसज्ज अशा स्वतःच्या प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष उभारणीही केली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी यंदा जिल्हा वार्षिक निधीतून आतापर्यंत सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच महापालिकांना देण्यात आला आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ८६ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध झाला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

मिशन बिगिन अगेनमुळे निर्बंध शिथिल होत असले तरी संकट टळलेलं नाही. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरु ठेवणे आवश्यक आहे, तर दुसरीकडे कोरोनापासून लोकांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. जनतेने या सर्व कामी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व कोरोना योद्ध्यांचे  समाज आणि देश म्हणून आपण कृतज्ञ राहायला पाहिजे, असेही ते म्हणाले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, कोरोना योद्धे,  विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.