श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून राबविली स्वच्छता मोहिम

श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून राबविली स्वच्छता मोहिम

ऊसगाव (प्रतिनिधी) :  भारत मातेचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने  त्यांचे  व्यक्तिमत्व, समावेशक अशा  देश आणि जगत हिताच्या विचार कार्याचा परिचय नव्या पिढीला होण्यासाठी आणि श्रमाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी श्रमजीवी संघटना महाराष्ट्राशी संलग्न श्रमजीवी सेवा दलाने गेल्या आठवड्यात पालघर, ठाणे, नाशिक व रायगड जिल्ह्यातील तालुका मुख्यालयातील प्रमुख शासकीय सार्वजनिक कार्यालयांत स्वच्छता मोहीम राबवून सेवादलाचा स्वावलंबन दिन या मोहिमेची सुरूवात करीत कृतीद्वारे स्वामी विवेकानंदाना आदरांजली अर्पण केली.

तहसील कार्यालये, पंचायत समिती कार्यालये, पोलिस स्टेशन्स, उपविभागीय अधिकारी कार्यालय इत्यादी कार्यालयांच्या इमारतीचा परिसर झाडून स्वच्छ करण्याचे काम सेवा दल सैनिकांनी केले. वसई तालुक्यातील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नंदिनी परेड, साक्षी पाठक व संदेश सुरुंदा या युवकांनी यावेळी कार्यक्रमाबद्दल ज्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

प्रत्येक महिन्यातून एक दिवस अशा प्रकारे स्वावलंबन दिनाचा उपक्रम राबवून  युवकांमध्ये श्रमाबद्दल आणि श्रमाचे काम  करणाऱ्यांबद्दलची प्रतिष्ठा  निर्माण करण्यासह राष्ट्र आणि समाज उभारणीच्या कार्यात युवकांना प्रेरित करण्याचे कार्य श्रमजीवी सेवा दलाने आरंभले असल्याची माहिती यावेळी श्रमजीवी सेवा दल प्रमुख तथा संघटनेच्या उपाध्यक्ष आराध्या विवेक पंडित यांनी दिली. 

मुलांनी आई वडिलांची प्रतिष्ठा राखावी, समाजातील श्रमणाऱ्यांना सन्मान द्यावा. या उद्देशाने स्वतः दैनंदिन जीवनात श्रम करावेत.शिक्षण घेता घेता सुद्धा आपण श्रम करू शकतो. श्रमातून जे मूल्य निर्माण होईल त्यातून आपल्या शिक्षणाचा खर्च मुले भागवू शकतात. आई वडिलांवर शिक्षणाचा भार, ताण देवून त्यांना आपल्या शिक्षणाचा भार उचलायला लावण्यापेक्षा युवकांनी आपल्या शिक्षणाचा भार आपल्या श्रमातूनच आपण निर्माण करावा. विवेकानंदांचा संदेश जीवनात अंगीकारून तरुणांनी मानवतेच्या हिताचे आणि राष्ट्र हिताचे कार्य करावे, असे प्रतिपादन विवेक पंडित यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एका ऑडिओ संदेशाद्वारे केले आहे. 

ठिकठिकाणच्या कार्यक्रमांत लोकसेवक-अधिकारींनी उपस्थित राहून, स्वावलंबन दिन उपक्रमातील सहभागी युवकांचे तोंडभरून कौतुक केले. वसईतील कार्यक्रमात तालुका उपाध्यक्ष नितीन पाटिल, केशव सावर, प्रभारी तालुका सचिव एकनाथ कलिंगडा, सहसचिव दिलीप लोंढे, प्रमिला पारधी, लक्ष्मीताई वाघ, संजिवनी सुरूंदा, संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते किसन चौरे, लोकमान्य टिळक मुक्त विद्यालयाचे विद्यार्थी व कामणचे माजी सरपंच दिनेश म्हात्रे, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या MSW विद्यार्थीनी आशा इंजिनिअर व तेजस्विनी यांची यावेळी उपस्थित होत्या.