केडीएमसीच्या आवारात कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’

केडीएमसीच्या आवारात कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट बनविण्याचा विडा उचलणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा एक नमुनेदार प्रकार समोर आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून (केडीएमसी) शहरात स्वच्छता राखण्यासाठी लोखंडी स्टँड असलेले नविन कचरा डबे मागविण्यात येत असताना केडीएमसी मुख्यालयाच्या आवारातील कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पालिका क्षेत्रात गाजावाजा करीत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. त्यासाठी शहरात यापूर्वीच ठिकठिकाणी लोखंडी स्टँड असलेले कचरा डबे बसविण्यात आले आहेत. या स्टँडला हिरवा आणि निळा असे दोन रंगांचे डबे आहेत. त्यापैकी हिरव्या डब्यात ओला कचरा तर निळ्या डब्यात सुका कचरा जमा करावयाचा आहे. महापालिका मुख्यालयात आधीच दोन ते तीन ठिकाणी हे स्टँड बसविण्यात आले होते. त्यापैकी एक स्टँड सुस्थितीत असून तो वापरात आहे, तर उर्वरित दोन स्टँड इतरत्र पडून

आहेत. या पडून असलेल्या एका स्टँडला दोन रंगांचे कचऱ्याचे डबे काही दिवसांपूर्वीपर्यंत दिसत होते. यापैकी एका स्टँडला कचऱ्याचे डबे असलेले दि. ११ मार्च २०२१ रोजी काढलेल्या छायाचित्रात दिसून येत होते. मात्र मधल्या काळात या स्टँडचे दोन्ही रंगांचे डबे गायब झाले. दि. ३१ मार्च रोजी काढलेल्या छायाचित्रात याच स्टँडला दोन्ही डबे नसल्याचे समोर येत आहे. पालिका मुख्यालयाच्या आवारातून या डब्यांची ‘सफाई’ कशी झाली, ते डबे कुठे गेले, असा सवाल यामुळे उत्पन्न झाला आहे. 

दरम्यान, २६ मार्च रोजी महापालिका मुख्यालयात सुमारे ३० नविन कचऱ्याचे स्टँड (डब्यांसह) आणण्यात आले आहेत. या स्टँडच्या दोन्ही डब्यांवर ‘स्वच्छ कल्याण डोंबिवली, सुंदर कल्याण डोंबिवली’ असे स्लोगन लिहिलेले आहे. या डब्यांचा तरी योग्य वापर होईल का, असा सवाल सुज्ञ कल्याण-डोंबिवलीकर करीत आहेत.