केडीएमसीच्या आवारातील ‘बैठकी’ची साफसफाई

केडीएमसीच्या आवारातील ‘बैठकी’ची साफसफाई

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात खेळण्याचे पत्ते आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्याची बातमी ‘कोंकण वृत्तांत’ने गुरुवारी दिल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. शुक्रवारी सकाळी ‘त्या’ जागेतील आडोशासाठी लावलेला लाकडी जाहिरात बोर्ड तेथून हटवण्यात आला व तेथे साफसफाई करून घेण्यात आली.  

महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारातील वर्षोनुवर्ष बंद अवस्थेतील कारंज्या लगतच्या मोकळ्या जागेत लाकडी जाहिरात बोर्डाचा आडोसा करून त्यामागे अज्ञातांनी ‘बैठकी’ची खास व्यवस्था केल्याचे समोर आले होते. गुरुवारी ‘कोंकण वृत्तांत’ने ही बातमी प्रसारित केल्यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. शहरात या बातमीची चर्चा रंगली. 

महापालिका प्रशासनाने सदर बातमीची दखल घेत शुक्रवारी मुख्यालयाच्या आवारातील ‘त्या’ बैठकीच्या जागेची साफसफाई करून घेतली. तेथील खेळण्याचे पत्ते, दारूच्या रिकाम्या बाटल्या हटविण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसापासून चाललेल्या या ‘बैठकी’कडे महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचे लक्ष नसल्याने त्यांच्या कर्तव्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी त्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते.