रेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

रेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरेतेमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याकडे कल्याण पूर्वेतील सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांनी ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच इमेल पाठवून लक्ष वेधले आहे. 

रेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे मेडिकल दुकानामार्फत त्यांचा काळाबाजार होत असल्याची ओरड होत होती. त्याकरिता सरकारने कोविड रुग्णालयांना थेट इंजेक्शन पुरवण्याचे जाहीर केले होते. जेणेकरून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ थांबेल. हा चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत होती. मात्र त्यानंतरही रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनकरिता धावपळ होतच होती. कित्येक खाजगी दवाखाने-रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना रेमेडिसीविर इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत असल्याच्या तक्रारी होत्त्या. डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांच्याकडून, आम्ही कलेक्टर किंवा पुरवठादारांकडे मागणी केलेल्या तुलनेत कमी इंजेक्शन मिळत असल्याने आम्ही ते किती पेशंटला देणार, असे उत्तर दिले जात होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास खाजगी रुग्णालयांकडून सांगितले जात होते. इंजेक्शनच्या कमतरतेमुळे त्याचा काळा बाजार होत असल्याची ओरड होत आहे.

भोसले यांनी हा सर्व प्रकार जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री कळवीत सगळ्या रुग्णालयांना रुग्णांच्या मागणीप्रमाणे इंजेक्शन दिल्यास लोकांची होणारी धावपळ थांबेल व तसेच काळा बाजार थांबेल याकडे लक्ष वेधले. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद देत कळविले की, ‘मला माहित आहे की रूग्णांची संख्या जास्त आहे परंतु आम्ही दररोज प्राप्त स्टॉकनुसार पुरवठा करीत आहोत. स्थितीत सामान्य होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील’.