ठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना सेवाशुल्क आकारण्यास सुरुवात

ठाण्यातील  शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना सेवाशुल्क आकारण्यास सुरुवात

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील शासकीय तसेच वनविभागाच्या जमिनीवर असलेल्या झोपड्यांना सेवाशुल्क लावण्याबाबत असलेल्या त्रुटी दूर करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. या त्रुटी दूर करुन येथील झोपड्यांना सेवाशुल्क लावण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिले होते. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करुन ठराव मंजूर केला. प्रशासनाने देखील या ठरावाची अंमलबजावणी करुन सेवाशुल्क लावण्याच्या कामाचा शुभांरभ बुधवारी (आज) महापौरांच्या हस्ते पातलीपाडा येथे करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नागरिकांना सेवाशुल्क अर्जाचे वाटप देखील करण्यात आले.

पातलीपाडा येथील ठामपा शाळा क्र. २३ मध्ये अर्ज वाटप करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपायुक्त (कर) अश्विनी वाघमळे, सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर,  उपकरनिर्धारक व संकलक गजानन गोदेपुरे आदी मान्यवर, तसेच नागरिक उपस्थित होते.

महापालिका कार्यक्षेत्रात शासकीय भूखंडावर वा वनविभागाच्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून झोपड्या व चाळी वसलेल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मुलभूत सेवा सुविधा देण्यात येतात, परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नव्हते. या नागरिकांना दिलासा मिळावा या दृष्टीने गेल्या अनेक वर्षापासून सेवा शुल्क आकारणीची मागणी सात्याने होत होती. या अनुषंगाने मा. महासभेत महापौर नरेश म्हस्के यांनी प्रस्ताव सादर केला. त्याला नगरसेवकांनी सर्वंकष चर्चा करुन संमती दर्शविली व महापालिकेच्या माध्यमातून सेवाशुल्क आकारण्यात यावे असे ठरविण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव  असल्यामुळे या कामास गती मिळत नव्हती. परंतु महापौर नरेश म्हस्के यांनी वारंवार पाठपुरावा करुन आयुक्त डॉ. विपीन शर्मा व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने या कामास सुरूवात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारपासून प्रत्यक्ष या कामास सुरूवात करण्यात आली.