उल्हासनगरमधील नागरी समस्या सोडविण्याचे आयुक्तांचे आ. गायकवाड यांना आश्वासन

उल्हासनगरमधील नागरी समस्या सोडविण्याचे आयुक्तांचे आ. गायकवाड यांना आश्वासन

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅम्प-४ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था इत्यादी नागरी समस्यांची दखल घेत कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्तांची नुकतीच भेट घेत चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदारांना दिले.

नागरिकांसोबत जनता दरबारच्या माध्यमातुन संवाद साधत असताना तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प-४ मधील नागरीकांच्या अनेक सूचना व तक्रारी प्राप्त होत होत्या. याचसंदर्भात उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त राजा दयानिधी यांची नुकतीच भेट घेवुन उल्हासनगर कॅम्प-४ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे, अभय योजनेमध्ये पाणी बिलाचा समावेश करणे, जुन्या नादुरुस्त कृपनलिका दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कामात होत असलेली अनियमिततेची चौकशी करणे, जुने विद्युत पथ दिवे बदलून एल.ई.डी. पथ दिवे बसविणे, दुरावस्था झालेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करणे तसेच उल्हासनगर महानगरपालिकेत अवैधपणे केलेली पदोन्नती यासारख्या अनेक समस्यांवर चर्चा केली.

महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर या सर्व समस्यां सोडवाव्यात विनंती आ. गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्त दयानिधी यांनीही सकारात्मक भूमिका घेवुन सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे त्यांना आश्वासन दिले.