गाळे हडपल्या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल 

गाळे हडपल्या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल 

कल्याण (प्रतिनिधी) : 
भाजप कार्यकर्ता सचिन यादवडे याने आपले दोन गाळे हडप केले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र राजकीय दबाव असल्याने पोलीस याप्रकरणी आरोपीवर कारवाई करीत नसल्याचा आरोप गाळा मालक महेंद्र नाईक याने पत्रकारांशी बोलताना केला आहे. 

कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागात महेंद्र नाईक यांच्या मालकीचे स्वाती को. हौसिंग सोसायटी इमारतीत दोन दुकान गाळे होते. यातील २४० चौरस फुटाचा एक गाळा भाजपा कार्यकर्ता यादवडे यांनी २०१४  साली भाडे तत्वावर घेतला होता.  मुदत संपल्यानंतर यादवडे याने गाळा परत केला नाहीच, उलट त्या गाळ्यालगतचा दुसरा ४०० चौ. फुट गाळा देखील जबदस्तीने बळकावला व ते स्वत:च्या नावे करून घेतले. या गाळ्यांचे मालमत्ता कर व वीज मीटर आपल्या नावे करीत त्यावर आपला मालकी हक्क सांगितला.

नाईक यांने याबाबत महापालिकेत चौकशी केली असता त्याला मालमत्ता कर यादवडे याच्या नावे लागल्याचे समजले. त्याला नाईक याने हरकत घेतली असता मालमत्ता कर हस्तांतरण प्रकरणी महापालिकेकडून सुनावणी घेण्यात आली व मालमत्ता कर पूर्ववत नाईक याच्या नावे करण्यात आला. याप्रकरणी धमकावण्यात येत असल्याने महेंद्र नाईक याने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. 

याप्रकरणी नाईक याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात सचिन यादवडे विरोधात फिर्याद दिली असून त्यानुसार महात्मा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ४२०,४०६,४४८, ४५४, ४५७,४६७,४६८ कलमान्वये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. त्याला आठवडा उलटून गेला तरी यादवडे याला पोलीस अटक करीत नसल्याबद्दल नाईक याने प्रश्न चिन्ह उपस्थित करीत राजकीय दबाव असल्याने पोलीस आरोपीला अटक करीत नसल्याचा आरोप केला आहे.