वाढीव वीज बिलांच्या ‘मुख्यमंत्र्याकडे तक्रारी’; आपचे कल्याण-डोंबिवलीत अभियान

वाढीव वीज बिलांच्या ‘मुख्यमंत्र्याकडे तक्रारी’; आपचे कल्याण-डोंबिवलीत अभियान

कल्याण (विराज खैर) : कोरोना (कोविड-१९) काळात लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बसलेले असताना, त्यांचा रोजगार बुडालेला, व्यवसाय बंद पडला असताना महावितरण कंपनीकडून त्यांना वाढीव वीज बिले पाठविली जात असल्याने त्याविरोधात आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे ‘तक्रारी करा’ अभियान सुरु केले आहे. जादा वीज बिले आलेल्या कल्याण-डोंबिवलीकर वीज ग्राहकांच्या लेखी, तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून तक्रारी अर्ज भरून घेत, या तक्रारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेण्याचे अभियान आपचे कल्याण-डोंबिवलीचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे.

आम आदमी पार्टीने वाढीव वीज बिले आणि विजेच्या दरवाढीविरोधात राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. आपच्या राज्य कार्यकारिणीच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातही या प्रश्नावर आंदोलने सुरु आहेत. कल्याण-डोंबिवलीकरांना देखील अव्वाच्या सव्वा वाढीव बिले आल्याने येथील वीज ग्राहक हवालदिल झाले आहेत. स्थानिक महावितरणच्या कार्यालयात तक्रारी करूनही या तक्रारींचे निराकरण समाधानकारक होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच कोरोनाच्या भीतीने महावितरणच्या कार्यालयात किती वेळा जायचे, असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे. दुसरीकडे, दि. १ एप्रिल २०२० पासून वीज दरवाढ करून सामान्य जनतेसमोरील संकट अधिकच वाढवून ठेवल्याने नागरिक अधिकच हैराण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने वाढीव वीज बिलांनी त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांचे तक्रार अर्ज भरून घेऊन ते मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यात येऊन त्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या अभियानाला कल्याण पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात सुरुवात करण्यात आली असून डोंबिवली, आंबिवली, टिटवाळा येथूनही वीज ग्राहकांचे तक्रार अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे गुगल फॉर्मच्या माध्यमातूनही हे तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत. 

दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे सरकार वीज ग्राहकांना वीज मोफत देत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने जनतेला २०० युनीट प्रती कुटुंब वीज मोफत वीज पुरवावी आणि कल्याण-डोबीवलीकरांना पाठवलेले जादा वीज बिल रद्द करून योग्य बिले देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांनी त्वरित निर्णय घ्यावा यासाठी हे अभियान आम आदमी पार्टीकडून चालविण्यात येत असल्याचे अॅड. धनंजय जोगदंड यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी व गुगल फॉर्मची लिंक प्राप्त करून घेण्यासाठी ९३२३२११३४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आम आदमी पार्टीकडून करण्यात येत आहे.