सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा- जयंत पाटील

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा- जयंत पाटील

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :  तिलारीसह जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी शनिवारी दिल्या. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.

या बैठकीस खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, वैभव नाईक, शेखर निकम, माजी आमदार प्रविण भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपवनसंरक्षक नारनवरे, दक्षिण  कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता रोहीत कोरे, हर्षद यादव, महादेव कदम यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी शासन स्तरावर असलेल्या प्रस्तावांसाठी तातडीने बैठकीचे आयोजन करावे असे सांगून पाटील पुढे म्हणाले की, तिलारी कालव्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. वारंवार कालवे फुटत असल्याबाबत तपासणी करून त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात यावा. त्यासाठी गोवा राज्याकडेही प्रस्ताव व आराखडा सादर करावा. शिरशिंगे धरणाची उंची कमी करून तो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा. नरडवे धरणाचे कामही लवकरात लवकर मार्गी लावण्याची कार्यवाही करावी. अनेक वर्ष रेंगाळलेला टाळंबा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभियंत्यांनी स्थानिकांशी चर्चा करावी. पहिल्या टप्प्यात त्यांना मान्य असलेल्या उंचीपर्यंत प्रकल्प उभारावा. तसेच कर्ली नदीमध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. नरडवे प्रकल्पग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेले पॅकेज लवकरात लवकर देण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. पुनर्वसन गावांमधील कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अशा गावांमध्ये करण्यात आलेल्या कामांना १० वर्षांची गॅरिंट ठेकेदाराकडून लिहून घ्यावी. जेणेकरून पुनर्वसन केलेल्या गावांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण होतील. मदतीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत आदी सूचना त्यांनी केल्या. तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांचे घर आणि जमीन दोन्ही कालव्यांमुळे बाधित झाले आहेत. त्यांना प्राधान्याने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांनीही प्रशासनाला काही सूचना केल्या. यावेळी तिलारी, टाळंबा, शिरशिंगे, नरडवे यासह जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या व निर्माणाधीन असलेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.