कल्याणमध्ये गुरांच्या बाजाराला सशर्त परवानगी

कल्याणमध्ये गुरांच्या बाजाराला सशर्त परवानगी

कल्याण (प्रतिनिधी) :
शेतीचा हंगाम सुरु झाल्याने पशुधनाची खरेदी-विक्री करण्यासाठी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात गुरांचा बाजार सुरु करण्यास कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  सशर्त परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले लॉकडाऊन काहींशी शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप बहुतांशी व्यवहारांवर बंधने कायम आहेत. मात्र सध्‍या खरीप हंगाम लक्षात घेता शेती व पशुधनाची खरेदी विक्री करण्यासाठी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात गुरांचा बाजार सुरु करण्यास परवानगी मागण्यात आली होती. त्या अनुषंगाने बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार सुरु करण्‍यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे.

कोरोना साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर, सदर ठिकाणी विक्रेत्‍यांना बसण्‍यासाठी तसेच नागरिकांना सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करण्‍यासाठी गोल/चौकानाची आखणी करणे आवश्‍यक आहे. प्रवेशद्वारावर तसेच ये-जा करण्‍याच्‍या ठिकाणी व सामायिक जागेत थर्मल स्क्रिनींग व हॅन्‍डवॉशची व्‍यवस्‍था करणे, आवारात येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीने मास्‍क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व गर्दी टाळणे बंधनकारक राहील. सदरचा बाजार दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहील, त्‍याचप्रमाणे दर रविवारी बंद राहिल याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. तसेच आठवडयातून दोन वेळा समितीच्‍या आवाराचे निर्जंतुकीकरण करणे देखील आवश्‍यक राहील. आदी शर्तींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे. या अटी व शर्तीचे उलघंन केल्‍यास सदरची परवानगी रद्द करण्‍यात येईल, असेही महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.