आंबिवलीतील ‘त्या’ मंदिराच्या अस्तित्वावरून परस्परविरोधी दावे 

आंबिवलीतील ‘त्या’ मंदिराच्या अस्तित्वावरून परस्परविरोधी दावे 

आंबिवली (प्रतिनिधी) : येथील मोहोने प्रभागातील जुन्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यात येत असलेल्या मंदिराच्या जोत्याचे बांधकामावर कारवाई करण्यावरून महापालिका प्रशासन आणि ग्रामस्थांकडून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. सदर टिकाणी मंदिर नसल्याचा दावा करतानाच महापालिका प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल असे सांगत सावध पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे ग्रामस्थ मंडळाने त्या ठिकाणी गावदेवीचे जुने मंदिर असल्याचा दावा करीत मंदिराचा जुना फोटो पुढे केला आहे.

‘अ’ प्रभागातील मोहने भागामध्ये सुरू असलेल्या  अनधिकृत बांधकामावर, विशेषत: जोत्यापर्यंत आलेली बांधकामे निष्कासित करण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली होती. त्यानुसार मोहोने परिसरातील जोत्यापर्यंत आलेल्या सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली होती. ‘त्या’ ठिकाणी कोणतेही मंदिर आस्तित्वात नव्हते किंवा मंदिर असलेबाबतची निशाणी नव्हती त्यामुळे निष्कासन मोहिमेमध्ये सदर ठिकाणचे बांधकाम निष्कासित करणेची कारवाई सुरू केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. ही कारवाई सुरू असतानाच तेथील स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी पूर्वीपासून छोटे मंदिर असून त्याचे वाढीव बांधकाम करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर बाबीची खात्री करणेसाठी निष्कासन कारवाई थांबविणेत आल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने ‘त्या’ ठिकाणी पूर्वीपासूनच मंदिर असलेबाबतची, तसेच जागेच्या मालकीबाबत संबंधिताकडून कागदपत्रे मागवून घेवून नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे संकेत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे शनिवारी दिले होते.

दरम्यान, मोहने येथील महानगरपालिकेने तोडलेले ‘ते’ बांधकाम गावदेवी मंदिराचेच असल्याचा दावा करीत मोहोने ग्रामस्थ मंडळाने एक प्रसिद्धीपत्रक प्रसृत करीत केले असून मंदिराचा जुना फोटो देखील त्यासाठी पुढे केला आहे. मंदिराच्या जोत्यावर महापालिका कारवाई करत असताना परिसरात राहणारे मुस्लिम बांधव तसेच नागरिकांनी अधिकाऱ्यांना मंदिराचे बांधकाम असल्याचे सांगितले व बांधकाम न तोडण्याची विनंती केली. परंतु सबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मंदिराचे बांधकाम तोडल्याचे ग्रामस्थ मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘त्या’ ठिकाणी मंदिर असताना कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ‘त्या’ ठिकाणी मंदिर नसल्याचा निर्वाळा देण्यात येत आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन खातरजमा करावी. येथील ग्रामस्थ व गावदेवी भक्तांच्या तसेच नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम करू नये, अशी मागणी ग्रामस्थ मंडळाने केली आहे. प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी या प्रकरणी माफी मागणे आवश्यक आहे. अन्यथा जनभावनेचा आक्रोश उसळल्यास त्याची सर्वथा जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असेल, असा इशारा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुभाष गंगाराम पाटील, सरचिटणीस रमेश कोनकर यांनी दिला आहे.