काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले

काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले

कल्याण (प्रतिनिधी) : शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपला होता, असं विधान शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. त्याला रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला नाही. तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीनिमित्ताने ते कल्याणमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं.

शिवसेना नेते अनंत गिते यांच्या टीकेवरही आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. १९९८ मध्ये मी शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गीते यांचा आरोप चूकीचा आहे, असे आठवले म्हणाले. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रूपयाचा माणहणीचा दावा करणार त्यांची तेव्हढीच किंमत असल्याची टीका केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही असा टोमणा मारला. राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाबाबत बोलताना रामदास आठवले यांनी सध्या उलट सुलट आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत त्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, संजय राऊत सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, नेते आहेत त्यांना अशा प्रकारचे आरोप करत वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही, असा सल्ला राऊत याना दिला.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपापसात आरोप सुरू आहेत. किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांच्या अनियमितता, भ्रष्टाचारबाबत तक्रार करत ईडीला पुरावे दिले आहेत, साखर कारखाने व इतर उद्योग करायला काही हरकत नाही. मात्र त्यात भ्रष्टाचार, अनियमितता असता कामा नये, असे स्पष्ट केले तर किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बहुतेक आमदार-मंत्री भाजपमध्ये गेलेत याबाबत बोलताना रामदास आठवले यांनी, असे आमदार-मंत्री भाजपमध्ये आले असतील तर इतरांनी जर त्यांचे  पुरावे असतील  बाहेर काढावेत असे आवाहन विरोधी पक्षांना केलं.