कल्याण शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई सुरु

कल्याण शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई सुरु

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रात कोविडच्या प्रादुर्भावाशी सामना करण्यात प्रशासकीय यंत्रणा गुंतली असताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. त्यांची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून त्यावर तोडक कारवाई सातत्याने सुरु आहे. त्यानुसार ‘अ’, ‘ड’ व ‘आय’ प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार  गेल्या चार दिवसात कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार  आणि विभागीय उपआयुक्त उमाकांत गायकवाड यांचे मार्गदर्शनानुसार ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रभाग क्षेत्रातील अटाळी येथे चालू असलेले सहा आरसीसी खोल्यांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई नुकतीच केली. त्याचप्रमाणे बल्याणी येथील चार जोत्यांचे अनधिकृत बांधकाम देखील तोडण्यात आले. 

‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने  प्रभाग क्षेत्रातील मांडा-टिटवाळा येथील अभिलाषा पार्क रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणारे, अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले मोठे होर्डिंग्ज निष्कासित करण्याची धडक कारवाई  केली. याचवेळी बल्याणी येथील पंधरा जोत्यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई देखील करण्यात आली.

‘आय’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे, ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी देखिल काल दिवसभरात संयुक्तपणे  विकासक विकास पवार यांचे आडीवली-ढोकळी येथील  तळ अधिक चार मजली इमारतीतील ३४ ब्लॉकचे बांधकाम व आरसीसी स्लॅब अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने निष्कासित करण्याची कारवाई केली.