मध्य रेल्वेकडून आवश्यक वस्तूंसह कोळशाचा अखंड पुरवठा सुरु 

मध्य रेल्वेकडून आवश्यक वस्तूंसह कोळशाचा अखंड पुरवठा सुरु 

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे रेल्वेने १४.४.२०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे.  सध्या, रेल्वे देशभरात फक्त फ्रेट गाड्या चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने  आपल्या अखंड मालवाहतूक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध राज्यांतील लॉकडाऊनच्या परिस्थिती दरम्यान, मध्य रेल्वेने अनेक मालवाहतूक धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत कर्मचारी तैनात केले असून आवश्यक असलेल्या वस्तूंच्या पुरवठा अखंडपणे सुरु ठेवला आहे.

गेल्या चार दिवसांत (२२ ते २५ मार्च  २०२०) एकूण अंदाजे ५.६६ लाख टन मालवाहतुक करण्यात आली आहे.  या वॅगनची संख्या ९,८३७ वॅगन इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील परळी, नाशिक, पारस, कोराडी आणि मौदा आणि मध्य प्रदेशातील सारणी व सिंगाजी येथे पाठविण्यासाठी १०२ रॅकमध्ये कोळसा भरला गेला.  एकट्या नागपूर विभागातून १०० रॅक आणि मुंबई विभागातून २ रॅक चालविण्यात आल्या.

गायगाव, खापरी, तडाली इत्यादी विविध ठिकाणी पुरवठा करण्यासाठी पेट्रोल, तेल आणि वंगण (पीओएल) आणि एलपीजी गॅस १७ रॅकमध्ये आणले गेले. एकट्या भुसावळ विभागातून १३ रॅक्स चालवले गेले.  तसेच कांद्याचा एक संपूर्ण रेक चालविण्यात आला. कंटेनर वाहतुकीच्या ५७ रॅकपैकी एकट्या मुंबई विभागातून ४६ रॅक्स चालविण्यात आले. फर्टिलायझरच्या सर्व ६ रॅक्सचा भरणा मुंबई विभागातून झाली आहे.

अत्यंत वरिष्ठ स्तरावरील अधिका-यांमार्फत फ्रेट वाहतूकीवर बारीक नजर ठेवली जात आहे.  मध्य रेल्वे या कठीण काळात आपली महत्त्वपूर्ण भूमिका जाणून आहे आणि सर्व भागधारकांना या प्रयत्नात पूर्णपणे सहकार्य करण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.