भारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

भारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचे महान क्रांतिकारक कार्य केले. आधुनिक भारताच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान हे अविस्मरणीय असे आहे. भारतीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळावे यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि समता निर्माण केली. देशाच्या लोकशाहीला समर्थ आणि सक्षम बनवणारी घटना देऊन जगातील सर्वोत्कृष्ट घटनांपैकी एक असा बहुमानही मिळवून दिला. भारतीयांचा प्रत्येक क्षेत्रात विकास व्हावा. त्याचे मुलभूत अधिकार त्यांना प्राप्त व्हावेत, समाजातील विषमता नष्ट व्हावी यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मुल्ये प्रस्थापित केली.

बौद्ध धम्म हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक

बाबासाहेब हे क्रांतिकारक, राजकीय, धुरंदर नेता तर होतेच, त्यासोबतच ते एक गंभीर अभ्यासक, सम्यक विचारवंत, आणि समाजशास्त्रज्ञही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महापुरुष होते. दलितांना त्यांचे राजकीय हक्क मिळवून देऊन त्यांची धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता केली. दलितांमध्ये स्वाभिमान जागृत व्हावा यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर करून प्रज्ञा, समता आणि करुणा शिकवणारा बौद्ध धम्माचा स्वीकार केला. यामागचे कारण असे की, बाबासाहेबांनी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि बौद्ध धम्मातच फक्त देव, आत्मा, पुनर्जन्म याला स्थान नाही. म्हणूनच केवळ मनुष्यच आपल्या सदसदविवेकबुद्धीने वाचवू शकतो आणि ती त्याला प्रज्ञा, शील, आणि करुनेनेच प्राप्त होते. बौद्ध धम्म हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक असून वैज्ञानिक विचारांचा धम्म असल्यामुळे मानवाचे कल्याण होण्याचे सामर्थ्य त्यात आहे.

राज्य समाजवादाची संकल्पना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. राजकारणी, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, अर्थतज्ञ, लेखक, म्हणून बाबासाहेबांनी असामान्य कार्य केले. बाबासाहेब हे चित्रकारही होते. त्यांनी बरीच पेंटिंग्ज केली होती. त्यांना कसरत करणे आवडत असे. बाबासाहेब संगीतप्रेमी होते. उत्तमोत्तम पेन बाबासाहेबांनी संग्रही होते. ते उत्कृष्ट बागवान होते. पशुप्रेमी-श्वानप्रेमी होते. बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांमध्ये मुलभूत स्वरूपाचे योगदान दिले, स्वातंत्र्यानंतर भारताचा आर्थिक विकास व्हावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी एक आदर्श प्रारूप तयार केले. त्यांनी आर्थिक विकासाचे प्रारूप, राज्य आणि अल्पसंख्यांकमध्ये मांडले. त्याकरिता त्यांनी राज्य समाजवादाची संकल्पना मांडली.

सर्व जातीधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ

गरीब, दरिद्री शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले. कोकणातील शेतकऱ्यांची खोतांच्या दास्यातून मुक्तता व्हावी म्हणून शेतकऱ्यांची चळवळ सुरु केली. रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजित केली होती. आणि या परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब होते. त्यांनी कोकणातील खोतांविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन उभारले. खोटी पद्धती नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक १७ सप्टेंबर १९३७ रोजी मुंबई विधिमंडळात मांडले होते. १० जानेवारी १९३८ रोजी २५ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली विधीमंडळावर नेण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या या यशस्वी मोर्च्यानंतर शेतकऱ्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने त्यांनी जाहीर सभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष बाब म्हणजे हे शेतकरी मराठे, कुणबी, आणि मुस्लीम होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या जातीचा विछार न करता सर्व जातीधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली होती.

शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांच्या उत्थानाकरिता मजुरांच्या समस्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर मंडल्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता. या पक्षात सर्व जातीधर्माचे मजूर होते. या पक्षातर्फे बाबासाहेबांनी मुंबई आणि सी. पी. अँड बेरार प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका लढविल्या होत्या. त्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार निवडून आणले. विशेष म्हणजे ते सव वेगवेगळ्या जातीचे होते. व्हाईसरॉय जनरलच्या मंत्रिमंडळात मजूरमंत्री म्हणून बाबासाहेबांचा समावेश करण्यात्त आला होता. बाबासाहेब मजूरमंत्री झाल्यानंतर देशातील मजुरांच्या कल्याणाच्या बाबतीत अनेक कायदे केले. कामगार कायद्यांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. स्त्रियांना कारखाना कायद्यानुसार रात्री काम करण्याची बंदी घातली. स्त्रियांच्या प्रसूतीकाळात त्यांना विशेष भरपगारी रजेचा फायदा मिळवून दिला. महिला-पुरुष कामगारांना समान वेतनाची तरतूद केली. बाबासाहेबांनी महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता देण्यात यावा यासाठी योजना तयार केली होती. त्या योजनेनुसारच आज शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्ता मिळतो.

भारताच्या उन्नतीची दूरदृष्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या नियोजित विकासाच्या संदर्भात अत्यंत महत्वाकांक्षी असे बहुद्देशीय प्रकल्प देशात उभारले. केंद्रीय जल आयोगाची स्थापना, दामोदर नदी योजना, हिराकूड नदी योजना, सोने नदी खोरे योजनांमुळे पुराचे संकट टळले आणि धरणांमुळे लाखो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था झाली, तसेच औद्योगिक विकासाकरिता विद्युत निर्मिती करण्यात आली. ‘दामोदर प्रकल्प हा बहुद्देशीय प्रकल्प असेल, आमचा उद्देश केवळ सिंचन, विद्युत आणि जल वाहतूक असला पाहिजे’ अशी बाबासाहेबांची भारताच्या उन्नतीची दूरदृष्टी होती.

दि प्रोब्लेम ऑफ रुपी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर अर्थशास्त्रज्ञ होते. देशातील आर्थिक विकासाबाबत चिंतन करून अतिशय महत्वपूर्ण विचार मांडले. औद्योगिकीकरण हे देशातील आवश्यक गरजा आणि देशातील स्रोत यावर आधारित असले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘दि प्रोब्लेम ऑफ रुपी’ हा अतिशय मोलाचा प्रबंध लिहिला. याचाच आधार घेऊन भारतात ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. अनेक देशांनी बाबासाहेबांच्या या ग्रंथाचा उपयोग करून घेऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत करून घेतली आहे.

मोठे आणि पायाभूत उद्योग हे राष्ट्राच्या मालकीचे

स्वस्त व मुबलक वीज असल्याशिवाय भारताचे औद्योगिकीकरण यशस्वी होऊ शकत नाही, हा दूरदृष्टीकोन ठेवून बाबासाहेबांनी विजेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण राष्ट्रीय धोरण तयार केले होते. याच राष्ट्रीय धोरणाच्या आधारावर स्वातंत्र्योत्तर काळात विजेचा विकास झाला. देशातील मोठे आणि पायाभूत उद्योग हे राष्ट्राच्या मालकीचे असले पाहिजेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी शेती हा राष्ट्रीय उद्योग असावा ही अभिनव संकल्पना मांडली. संपूर्ण शेती ही राष्ट्राच्या मालकीची असेल आणि शेती करण्यासाठी ती शेतकऱ्याला दिली जाईल. शेतीची लागवड आणि बी-बियाणे इत्यादीसाठी पतपुरवठा शासन करील. पिक आल्यानंतर शेतकरी शासनाने लावलेला पैसा शासनाला परत करील. 

नागरिकांना मुलभूत हक्क आणि न्यायाची हमी

पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ इत्यादी देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित होऊ शकली नाही. त्या देशांत सतत राजकीय अस्थैर्य आहे. परंतु आपला देश मात्र बाबासाहेबांच्या लोकशाहीमुळे राजकीयदृष्ट्या स्थिर आहे. बाबासाहेबांमुळेच भारत देशाची अखंडता आणि एकता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात राज्यघटनेचे विशेष योगदान आहे. राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना मुलभूत हक्क आणि न्यायाची हमी दिली. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात प्रचंड योगदान दिले. डॉ. आंबेडकर हे जरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असले तरी स्वातंत्रोत्तर भारताचे देखील शिल्पकार आहेत. अशा या राष्ट्रीय महापुरुषाच्या ऐतिहासिक कामगिरीला कोटी कोटी प्रणाम!
---
लेखक: विजय कोकरे
कल्याण.
मोब.नं.:९३२३०६०५३०