कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नगरसेवक पती-पत्नीने दिला ३० लाखांचा निधी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नगरसेवक पती-पत्नीने दिला ३० लाखांचा निधी

कल्याण (प्रतिनिधी) : देशभरात कोरोना आजाराने ग्रस्त नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही हे रुग्ण आढळून आले आहेत. या कोरोनाग्रस्त नागरिकांच्या उपचारासाठी डोंबिवली येथील शिवसेना नगरसेवक पती-पत्नीने आपला संपूर्ण निधी एकूण ३० लाख रुपये दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना नुकतेच पत्र दिले आहे.

कोरोनाने जगभरातील असंख्य देशांप्रमाणे भारतातही शिरकाव केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या मोठी नसली तरी त्यात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत आहे. दुसरीकडे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असल्याने शासकीय तिजोरीवर त्याचा फार मोठा भार पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन डोंबिवली येथील शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे व त्यांच्या पत्नी भारती राजेश मोरे हे दोघेही महापालिकेत नगरसेवक असून त्यांनी सन २०२०-२०२१ सालचा प्रत्येकी १५ लाख असे एकूण ३० लाख रुपयांचा नगरसेवक निधी कोरोनाग्रस्त नागरिकांच्या उपचारासाठी खर्च दिला असून तसे पत्र त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.