एनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी केला विरोध 

एनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी केला विरोध 

टिटवाळा (प्रतिनिधी) : कल्याण नजीक असणाऱ्या मोहने येथील नॅशनल रेयॉन कार्पोरेशन (एनआरसी) कारखान्याच्या वसाहतीमधील पडीक बंगल्यांवर अदानी समूहाने पोलिस संरक्षणात तोडक कारवाई सुरू केली असता त्याला कामगार व महिलावर्गाने जोरदार विरोध दर्शविला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांच्यावर सौम्य लाठीमार केल्याचा आरोप येथील महिलावर्गाने केला आहे. दुसरीकडे विरोध दर्शविणाऱ्या दोन महिलांसह सहा कामगार नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एक महिन्यापूर्वी येथील कामगार वसाहतीत अशाच स्वरुपाची तोडक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कामगार व महिलावर्गाने त्याला विरोध केला होता. बुधवारी (आज) सकाळच्या सुमारास वसाहतीमधील एका बंगल्यावर चार जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई सुरू करण्यात आली. त्यावेळी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी

हजर होते. संतप्त कामगारवर्गाने व महिलांनी व्यवस्थापन व पोलिसांच्या विरोधात नारेबाजी सुरु करीत या कारवाईला विरोध दर्शविला. तेव्हा वातावरण तणावग्रस्त झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचा आरोप कामगार व महिलांनी केला. मात्र पोलिसांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.

एन.सी.एल.ई.टी. दिल्ली न्यायालयात कामगारवर्गाच्या वतीने आयटक युनियनने याचिका दाखल केली असून त्याची उद्या (२१ जानेवारी) सुनावणी आहे. त्याआधीच आज अदानी समूहाने पडिक बंगल्यांवर कारवाई केल्याने कामगारवर्गात संतापाची लाट उसळली आहे. आंदोलन अधिक चिघळू नये याकरिता खडकपाडा पोलिसांनी आठ प्रमुख कामगार नेत्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतले.

कारवाईचे पेपर दाखवा, पोलिसांना सवाल!

एनआरसी संदर्भात बंगले तोडण्यास संरक्षणास आलेल्या खडकपाडा पोलिसांना आंदोलनकर्त्या महिलांनी बंगले तोडण्याचे लेखी आदेश आहेत का, अशी विचारणा करीत असे आदेश असतील तर आम्ही येथून लगेच निघून जातो सुनावले. त्यावर पोलीस मात्र निरुत्तर झाले. दरम्यान, संतप्त महिलावर्गाने दुपारी ४ नंतर मोहने गेट येथे रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे वृत्त असून त्यांनी रास्ता रोको करण्याचाचा इशारा पोलिसांना दिला आहे.