पॅरोलच्या रजेवर असताना सराईत गुन्हेगाराने केले गुन्हे 

पॅरोलच्या रजेवर असताना सराईत गुन्हेगाराने केले गुन्हे 

कल्याण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात वेगवेगळया जिल्हयात सराफा दुकान फोडुन घरफोडी चोरी करणे, दरोडें, दरोडयाची तयारी, खुनाचा प्रयत्न व सोनसाखळी चोरी अश्या अकरा  गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. शिवासिंग विरसिंग दुधानी (२८) रा. आंबवली  असे अटक केलेल्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारच नाव आहे.

१८ जून रोजी सकाळच्या सुमारास फिर्यादी पुनम सिंग (५७) या कल्याण पश्चिम भागातील  ठाणगेवाडीकडुन रामबागकडे जाणाऱ्या रोडवरून मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्याच सुमारास ठाणगेवाडी भागात मोटारसायकल वरून समोरून आलेल्या दोन आरोपी पैकी मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून धूम ठोकली होती. याप्रकरणी  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल केला. त्यानंतर या गुन्हयाच्या आरोपीचा शोध घेण्याकरीता खास पथकाची नेमणूक करण्यात आली. या तपासामध्ये  सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलच्या तांत्रीक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त करून सराईत गुन्हेगार हा पॅरोल रजेवर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.  त्यानंतर आंबिवली रेल्वे स्टेशन परीसरात पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली.

पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे सखोल चौकशी केली असता तो पॅरोल रजेवर असताना त्यानी त्याच्या साथीदारासह रसायनी पोलीस स्टेशन रायगड, वडकी पोलीस स्टेशन यवतमाळ, वडनेर पोलीस स्टेशन वर्धा, मौदा पोलीस स्टेशन नागपुर, जवाहरनगर पोलीस स्टेशन भंडारा, साकोली पोलीस स्टेशन, लावणी पोलीस स्टेशन भंडारा या ठिकाणी सराफा दुकाने फोडून घरफोडी केली असून या गुन्हयात तो फरार होता. आतापर्यत एकूण ११ गुन्हयात अटक करणे बाकी असल्याची माहिती  सहा. पोलीस आयुक्त  अनिल पोवार यांनी दिली आहे.

आरोपी शिवासिंग विरसिंग दुधानी याने त्याचे साथीदारासह कल्याण परीसरात चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या ४ गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे. या  गुन्हयातील मंगळसूत्र, रोख रक्कम, रोडा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल असा एकूण १, लाख ३४, हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे. इतरही गुन्हयाचा तपास पोलीस पथक करीत आहेत.