कोकणातील जमिनीत जगातील सर्वाधिक महागड्या तांदळाची लागवड

कोकणातील जमिनीत जगातील सर्वाधिक महागड्या तांदळाची लागवड

मंडणगड (प्रतिनिधी) : जगातील सर्वाधिक महागडा व खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जाणारा, आणि त्यामुळेच औषध कंपन्यांकडून देखील मोठी मागणी असलेल्या काळ्या तांदळाची शेती मंडणगड तालुक्यातील भोळवली व सावरी गावात यंदाच्या भात शेतीच्या हंगामात करण्यात आली आहे. भोळवली या गावातील तरुणांनी एकत्रित येत काळ्या तांदळाची शेती केली आहे. त्यांनी केलेल्या शेती क्षेत्रातील या प्रयोगाचे केवळ तालुक्यातीलच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

भोळवली गावातील शांताराम सुगदरे, भावेश सुगदरे, सुनील घाडगे, संदेश सुगदरे आदी तरुण शेतकऱ्यांनी काळ्या भात पेरला आहे. यापूर्वी दापोली तालुक्यातील करंजाळी अभिषेक सुर्वे तसेच सावरी गावातील अमोल तांबे काळा भात केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अनेक कोकणातील तरुण  शेतकरी प्रयोगशील शेतीकडे वळत आहेत. यंदा तालुक्यातील सावरी गावातही अशाप्रकारे काळ्या तांदळाची लागवडीचा प्रयोग यंदा केलेला दिसून आला आहे.

संपूर्ण पीक हे जीवामृतचा वापर करून घेतले आहे. आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेत काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धान्याची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाल्याचे या तरुण शेतकऱ्यांनी सांगितले. कमी दिवसात चांगले उत्पादन झाल्याने ते खुश आहेत. 

औषधी गुणांमुळे महत्व

काळ्या तांदळामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट आणि ॲथोसायनिन असतात, काळ्या भातांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. हृदयासंबंधी आजारांमध्ये ते फायदेशीर असून, डायबिटीज आणि कॅन्सरवर परिणामकारक आहे. प्रोटीन आणि आयर्न मुबलक प्रमाणात असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग 
होत असल्याने या तांदळाला देश विदेशात मागणी असते.

काळ्या तांदळाला परदेशातही मागणी

फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईसची लागवड केली जात होती. भारतामध्ये ब्लॅक राईस उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे या तांदळाला मोठ्या शहरात व परदेशात चांगली मागणी आहे. मोठ्या शहरात काळा तांदूळ किमान तीनशे रुपये ते चारशे रुपये किलो दराने विकला जातो. अमेझॉनसारख्या ऑनलाईन साईटवरही या तांदळाची विक्री केली जाते.