कल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ लाभ

कल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ लाभ

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली परिसरात नविन घर घेणाऱ्या ग्राहकांकडून ‘झिरो स्टॅम्प ड्युटी’ आकारण्याची घोषणा येथील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार असून बांधकाम व्यावसायिकांच्या एमसीएचआय क्रेडाई कल्याण डोंबिवली युनिटने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. 

बांधकाम क्षेत्रामध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि ग्राहकांना नविन घर खरेदीकडे आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने ६ टक्के असलेली स्टॅम्प ड्युटी निम्म्यावर म्हणजेच ३ टक्के आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एमसीएचआयच्या कल्याण डोंबिवली युनिटने ग्राहकांकडून ‘शून्य स्टॅम्प ड्युटी’ घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत  केली.  

एमसीएचआयच्या कल्याण डोंबिवली युनिटमध्ये सहभागी असलेल्या ५० नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कल्याण डोंबिवली शहरात सद्य स्थितीला ७५ पेक्षा अधिक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये परवडणाऱ्या घरे, आलिशान लक्झरी घरांचा समावेश आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगत शितोळे यांनी एमसीएचआयच्या या निर्णयामुळे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांची मोठी बचत होऊन त्यांचा फायदा होणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष रवी पाटील, अध्यक्ष दिपक मेहता, सचिव विकास जैन, जोहर झोजवाला, अमित सोनावणे आदी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.