‘चाईल्ड पॉर्न’ विरोधात सायबर विभाग कठोर कारवाई करणार

‘चाईल्ड पॉर्न’ विरोधात सायबर विभाग कठोर कारवाई करणार

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना साथीचा सामना करण्यासाठी सध्या लॉकडाऊन आहे. या कालावधीत एक त्रासदायक बाब उघड झाली आहे. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचा मुलगा भुवन रिभू यांच्या इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंड (आयसीपीएफ) ने केलेल्या संशोधनात ‘चाइल्ड पॉर्न’, ‘सेक्सी चाइल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ याकडे कल असून याबाबतीतील सर्चच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे ताज्या आकडेवारीत निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याविरुद्ध कठोर  कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘महाराष्ट्र सायबर’ला दिले आहेत .

नवी दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, इंदौर व १०० भारतीय शहरांमधील ट्रेंड मॅप करणाऱ्या ‘बाल लैंगिक अत्याचार सामग्री’ या नावाच्या अहवालात लॉकडाऊन पूर्वीच्या तुलनेत भारताच्या पॉर्नहबवरील वाहतुकीत ९५% वाढ झाली आहे.

ऑपरेशन ब्लॅकफेस

‘चाईल्ड पॉर्न’ विरुद्ध जानेवारीच्या मध्यापासून विशेष 'ऑपरेशन ब्लॅकफेस' द्वारे आपण  महाराष्ट्राला चाईल्ड पॉर्न विरुद्ध लढणारे प्रथम क्रमांकाचे राज्य बनवले आहे.  लॉकडाऊन दरम्यान वाढलेला ‘चाइल्ड पॉर्न’चा प्रकार अतिशय गंभीर आहे, याविरोधात महाराष्ट्र सायबर सेलला आपले प्रयत्न अधिक व जोरदार करण्याचे निर्देश यापूर्वी दिले आहेत. 

गृहमंत्री म्हणून मला याची जाणीव आहे की लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या मुलांसाठी हा मोठा धोका बनू शकेल. लॉकडाऊन कालावधीत वाढत्या प्रमाणात बाल बलात्कारी, चाईल्ड पॉर्न व्यसनी ऑनलाईन येत आहेत. दुसरीकडे लॉकडाऊन च्या  काळात मुलं घरबसल्या खेळण्याकरिता, ऑनलाईन वर्ग व मित्र/मैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी इंटरनेट चा वापर करत आहेत. याचा फायदा गुन्हेगार सायबर-ट्रॅफिकिंग, ग्रूमिंग (एखाद्या मुलाशी अथवा कधीकधी कुटुंबाशी मैत्री करण्याचं कृत्य, जेणेकरून त्या मुलाचा विश्वास संपादन करून लैंगिक शोषण), इत्यादी गोष्टींसाठी करू शकतात. पालकांनी म्हणूनच सावध राहिलं पाहिजे, असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी केले आहे. या संदर्भात स्थानिक पोलिस/महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क करा. तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही संपर्क करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.