पालकांसाठी धोक्याची घंटा ! अल्पवयीन मुले नशेबाजीच्या विळख्यात !!

पालकांसाठी धोक्याची घंटा ! अल्पवयीन मुले नशेबाजीच्या विळख्यात !!

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण शहरातील अल्पवयीन-लहान मुले अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. यातील बहुतांशी मुले ही १४ ते १७ वयोगटातील असून बहुतांशी सर्वसाधारण घरातील आहेत. अशा प्रकारे शालेय मुले अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ लागल्याने ही पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे, तर या प्रकारांमुळे पोलीस प्रशासनासमोरही आव्हान उभे राहिले आहे.

मुलांमध्ये धुम्रपान, मद्यपाना बरोबरच अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. इतर नशेच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध होणारे एक विशिष्ट अंमली पदार्थ शहरात सहज मिळत असल्याने त्याकडे अल्पवयीन मुले देखील ओढली जात आहेत. या नशेत या मुलांकडून मुले मुली-महिलांची छेडछाड करणे, एकट्यादुकट्या लहान मुलांना अकारण बेदम मारहाण करणे, आरडओरड करीत धिंगाणा घालणे, विक्षिप्त-अश्लील हावभाव-टिप्पणी करणे असे प्रकार घडत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहेत. हीच मुले इतर मुलांना नशेबाजीकडे ओढून त्यांचेही जीवन बर्बाद करीत आहेत. या सर्व प्रकाराची परिणीती एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची भीती जागरूक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरी कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीवरून नजीकच्या इमारतींवर दगडफेक करण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले होते. हे प्रकार काही नशेबाजांकडून होत असल्याचे बोलले गेले. 

आजच्या धकाधकीच्या काळात पालकांचा कितीही प्रयत्न असला तरी मुलांवर चोवीस तास लक्ष ठेवणे शक्य होत नाही. परिणामी त्यांची मुले अन्य मित्रांच्या संगतीत अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. कल्याण शहरातील काही महाविद्यालये व शाळांचा परिसर अशा नशेखोरीच्या प्रसाराची केंद्रे ठरू नयेत यासाठी व अल्पवयीन मुलांना या जीवघेण्या नशेपासून वाचविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नशेबाजांचे  अड्डे...

शहरातील निर्जन ठिकाणे अशा नशेबाजांचे अड्डे ठरत आहेत. यामध्ये कल्याण पूर्वेतील रेल्वे वसाहत परिसर- मित्रा टाईप कॉलोनी, रेल्वे यार्ड परिसर, कोळसेवाडी येथील मॉडेल शाळेच्या समोरील मोकळी जागा, पुना लिंक रस्त्यावरील नूतन ज्ञानमंदिर शाळा परिसरातील मोकळी जागा, रेल्वे हॉस्पिटल परिसर, ‘ड’ प्रभाग समिती कार्यालय परिसर व लगतची गणेश टेकडी, नेतवली टेकडी, क्रीस्टील प्लाझा मागे, आनंदवाडी रेल्वे बिल्डीग, कर्पेवाडी-व्दारका शाळा परिसर, नांदीवली परीसर, खडेगोळवली परीसर यासारखी अनेक ठिकाणे असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे वसाहत परिसरातील रिकामी क्वाटर्स काही नशेबाजांच्या वावराची महत्वाची ठिकाणे असल्याने त्यांची नियमित तपासणी करण्याची आवश्यकता येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.