झाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला धोका

झाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला धोका

आंबिवली (प्रतिनिधी) : येथील मोहोने भागात एनआरसी कारखान्यांची निर्मिती करताना गोएंका उद्योग समूहाने दळणवळणासाठी मालवाहतूक सुविधेला प्राधान्य देत उल्हास नदीवर ७० वर्षांपूर्वी पूल उभारला होता. आता या पुलाच्या संवर्धनाकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विशेष प्रकल्प विभाग कानाडोळा करीत असून पुलाभोवती मोठमोठ्या झाडांचा उगम झाल्याने त्यांची मुळे पुलामध्ये शिरल्याने पुलाला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आबिवली येथील एनआरसी कारखाना आता बंद झाला असला तरी कारखान्याने प्रारंभी काळातच दळणवळणाची गरज ओळखून वडवली रेल्वे पुलाला समांतर उल्हास नदीवर ७० वर्षापूर्वी पूल बांधला होता. या पुलाचा नागरिकांसह परिसरातील अमर डाय केमिल्कस लिमिटेड, नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड, बाळकृष्णा पेपर मिल, अजंठा पेपर मिल, बी के पेपर मिल आदि कारखान्यांना उपयोग होत होता. मालवाहतुकीसाठी या पुलाच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध झाल्याने कारखान्यांसाठी कच्चा व पक्का माल या मार्गावरून देशात अनेक भागात जाऊ लागला. आता परिसरात केवळ दोन कारखाने तग धरून आहेत.

एकीकडे रेल्वे पुलाच्या बाजूला मोहने अंबिवली टिटवाळा खडवली पर्यंत जाणाऱ्या वाहतूक पुलांची दुर्दशा झाल्याचे दिसून येत आहे. सत्तर वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाला डांबरीकरण करण्याशिवाय महापालिकेने दुसरे काम करताना दिसून येत नाही.

पुलाला झाडाझुडपांनी व्यापले !

एनआरसीमुळे फुकटात मिळालेल्या उल्हास पुलाच्या देखरेखीकडे लक्ष देण्यास कल्याण डोंबिवली महानगरपालिका व राज्य शासनाच्या सबंधित विभागाला सवड मिळत नसल्याने या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. बाजूच्या रेल्वे पुलावरून जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमुळे या पुलाला हादरे बसतात ही बाब सबंधित विभागांच्या गावीही नसायचे दिसते. केवळ पुलावरील रस्त्यावर डांबरीकरणाची मलमपट्टीची झालर टाकली जाते. उल्हास नदीच्या पुलावर १९८३ साली महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिस्सारण विभागाने २० इंच जाडीची माईल्ड स्टील पाईपलाईन धोबी घाटमार्गे शहाड येथून या पुलावर टाकलेली आहे.

फाईल वर्कऑर्डरची प्रतीक्षा

यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विशेष प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता विश्वास पाटील यांना उल्हास नदी पुलाला झाडाझुडपांनी व मुळांनी जखडून टाकले संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की झाडे कापण्याची फाईल मंजूर झाली असून वर्कऑर्डरच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगत आठवड्यात झाडे कटिंग करण्यास सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक वर्षांपूर्वी वृत्तपत्रात अशाच प्रकारचे वृत्त आल्यानंतर काही वेळा पुलातून उगवलेली झाडाझुडपे काढली गेली होती. त्यानंतर पुन्हा या कामाकडे महापालिकेच्या सबंधित विभागाने कानाडोळा केला.

रेल्वे पुलासाठी रेल्वे सतर्क 

ब्रिटिशांनी उल्हास नदीवर बांधलेला रेल्वेचा दगडी पूल आजही चांगल्या स्थितीत आहे. रेल्वे प्रशासन पुलाभोवती उगवलेले झाडेझुडपे काढून पुलाच्या देखरेखीकडे लक्ष पुरवताना दिसते. दर महिन्याला अधिकारीवर्गांचे पथक येऊन पाहणी करून जात असल्याची माहिती मिळत आहे.