कल्याणमध्ये प्रथमच हाय रिप जॉ क्रशर मशिनद्वारे धोकादायक इमारतीचे पाडकाम

कल्याणमध्ये प्रथमच हाय रिप जॉ क्रशर मशिनद्वारे धोकादायक इमारतीचे पाडकाम

कल्याण (प्रतिनिधी) : हाय रिप जॉ क्रशर या भल्यामोठ्या मशिनद्वारे शहरातील अतिधोकादायक मुस्तफा मंजील नामक इमारतीचे निष्कासनाचे काम सुरु करण्यात आले आहे. कल्याण शहरात पहिल्यांदाच या मशीनद्वारे इमारतीचे पाडकाम करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे पाडकाम पाहण्यासाठी नागरिक उत्सुकतेने शंकरराव चौकात येत आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बहुमजली इमारतींची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी यापूर्वी जेसीबी, पोकलेन या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येत होता, परंतू निष्कासनाचे काम अधिक सक्षमपणे करण्याकरीता महापालिकेने मंजूर निविदा धारकामार्फत हाय रिप जॉ क्रशर मशिन आज मागविली. या यंत्राचा वापर करुन धोकादायक, अतिधोकादायक सुमारे ७ ते ८ मजली इमारतींचे बांधकाम निष्कासित करणे सुलभ होणार आहे आणि या यंत्राने इमारतींचे निष्कासन केल्यामुळे वेळेची बचतही होणार आहे.

ऐतिहासिक कल्याण शहरातील महापालिका कार्यालयासमोरील मुख्यद्वार, शंकरराव चौक येथील मुस्तफा मंजील या अतिधोकादायक इमारतीच्या‍ निष्कासनाचे ऊर्वरित काम आज या यंत्राचा वापर करुन सुरु करण्यात आले. हि मशिन ही महाराष्ट्रातील मोजक्याच शहरांमध्ये आहे. या यंत्राच्या वापराचा पहिलाच दिवस असल्याने नविन यंत्राचा वापर सुरु करतांना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्यलेखा परिक्षक लक्ष्मण पाटील, उपायुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त उमाकांत गायकवाड, विभागिय उपआयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, आदी या प्रसंगी उपस्थित होते.