एनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त

एनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त

कल्याण (प्रतिनिधी) : आंबिवली स्टेशनच्या शेजारी असलेल्या एनआरसी कंपनीमधील अति उंचीची धोकादायक स्थितीतील चिमणी शुक्रवारी अखेरीस पाडण्यात आली. 

परिसरात सतत दोन दिवस आधीपासून गस्त घालून जनजागृती करण्यात आली होती. शुक्रवारी चिमणी पाडण्यास सुरुवात करण्यात आली. चिमणी कंपनीच्या आवारात पडेल यादृष्टीने नियोजन करण्यात आले होते. ही चिमणी खाली आल्यावर कामगारांनी टाळ्या वाजवल्या तर रेल्वे व केडीएमसी अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी टिटवाळा-आंबिवली रस्ता बंद केला होता.

ही चिमणी एनआरसी कपंनी १९५० साली बांधण्यात आली त्यावेळी उभारण्यात आली होती. सुमारे १३ वर्षांपूर्वी एनआरसी  कंपनीत टाळेबंदी झाली. परिणामी परिसरातील हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. कंपनी बंद झाली असली तरी कंपनीतील रेल्वे स्थानकालगतची अतिउंच असलेली चिमणी मधल्या काळात धोकादायक झाल्याचे दिसत होते. ही धोकादायक चिमणी पाडण्यासाठी रेल्वे, केडीएमसी व खडकपाडा पोलीस स्टेशन यांनी वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाला नोटीसा बजावल्या होत्या. 

सदरची धोकादायक चिमणी लगतच्या रेल्वे मार्गात कोसळून मोठा अपघात होण्याची भीती असल्याने ही चिमणी तातडीने जमीनदोस्त करावी अन्यथा आंदोलन करण्याचा स्थानिक नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच रेल्वे प्रशासनाशी देखील त्यांनी पत्रव्यवहार केला होता. दरम्यान, कंपनीच्या आवारातील अन्य दोन आरसीसी चिमण्या व चार स्टीलच्या चिमण्याही लवकरच पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.